आढळगावात जलजीवनचे पाणी पेटले
योजनेच्या विरोधात वारंवार तक्रारी करणार्यांविरोधात कारवाईची मागणी
श्रीगोंदा । वीरभूमी - 13-Jun, 2023, 12:44 PM
आढळगाव येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. परंतू या योजनेला गावातील काही सत्ताधारी सदस्य व विरोधकांचा टोकाचा संघर्ष दिसत असल्याने या योजने विरोधात वारंवार तक्रारी करणार्या माजी जिल्हा परिषद सदस्य व पत्रकार अनिल ठवाळ यांच्या विरोधात प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्यासाठी चक्क गावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी पंचायत समिती कार्यालयात प्राणांतिक उपोषण केले. गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांनी सगळी परिस्थिती समजून दोषींवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंदोलनकर्ते सरपंच शिवप्रसाद उबाळे यांचे म्हणने आहे की या पाणी योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू असून ठेकेदार मोहन दामोदर गोडसे हे काम पहात आहेत. या योजनेसाठी जैन कंपनीचे पाईप आणलेले आहेत. सदरच्या पाईपची हायड्रोलिक टेस्ट झालेली आहे. परंतु गावातील काही समाजकंटक खोटया तकारी करुन जाणीवपूर्वक काम बंद करणेचा प्रयत्न करत आहेत. यात अनिल भगवान ठवाळ व इतर चांडाळ चौकडी सतत तकारी करुन काम बंद पाडत आहेत.
अनिल भगवान ठवाळ व इतर चांडाळ चौकडी यांनी या अगोदरही राष्ट्रीय महामार्ग श्रीगोंदा - जामखेड रस्त्याचे काम तकारी करुन बंद पाडले आहे. श्री अनिल भगवान ठवाळ यांनी कित्येक अधिकार्यांच्या खोटया तकारी केलेल्या आहेत. सततच्या खोटया तकारी मुळे श्रीगोंदा तालुक्यात कुठलाही अधिकारी येत नाही. सदर जलजीवन मिशन योजने बाबतच्या सुध्दा खोटया तकारी करुन ही योजना बंद करून हाणुन पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व कार्यक्षम अधिकार्यांच्या खोट्या तक्रारी त्यांनी यापूर्वी केलेल्या आहेत. तरी या व्यक्तीच्या वारंवार तक्रारीमुळे विकास कामे ठप्प झाले आहेत. ठवाळ यांच्या तक्रारीची पुराव्याशिवाय दखल घेतली जाऊ नये त्यांना कायदेशीर प्रतिबंध घालण्यात यावा. अशी मागणी आंदोलनात केली आहे. यावेळी गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांनी सर्व परिस्थिती समजून घेऊन कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी सरपंच शिवप्रसाद उबाळे, हनुमंत सर्जेराव डोके, मनोहर दिलीप शिंदे, मधुकर शंकर गिरमकर, जालिंदर बळीराम बोडखे, शरद शंकर जमदाडे, नितीन बन्सी गव्हाणे, अनिल धोंडीबा शिंदे, अतुल दयानंद भैलुमे, रघुनाथ प्रकाश शिंदे, अभिमन्यु बबन ठवाळ, दादासाहेब शंकर गव्हाणे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
या पाणी योजनेचे काम निकृष्ट चालु असुन ग्रामसभेत झालेल्या ठरावाच्या विरोधात सरपंच काम करत आहेत. फक्त पैसे खाण्यासाठी ही योजना गावावर लादत येणार्या भविष्य काळात निकृष्ट दर्जाची कामे केल्याने सरपंच गावाला स्वतःच्या फायद्यासाठी अडचणीत आणत आहेत.
- उत्तमराव राऊत, विरोधी गटाचे नेते
जलजीवन मिशन अंतर्गत चाललेले काम बोगस असून स्वतः सरपंच यांनी दुसर्या ठेकेदाराचे नावं पुढे करून स्वतः काम घेतले आहे. या योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याने मी तक्रारी केल्या आहेत. सरपंच यांचे दोन नंबरचे धंदे असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. मी संविधानाचा पाईक असून एकही गून्हा दाखवा मी गाव सोडून देईल. या योजनेत निवडणुकीतील झालेला खर्च काढण्यासाठी व फक्त पैसे खाण्यासाठी हा उपद्व्याप सरपंच करत असुन गावाला वेठीस धरणार्या सरपंचाला गाव कदापी माफ करणार नाही.
- अनिल ठवाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य
Comments