छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपहार्य पोस्ट करणार्याचा निषेध
पारनेर । वीरभूमी - 13-Jun, 2023, 12:52 PM
पारनेर तालुक्यातील पाबळ येथील वसिम सय्यद यांने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल इंस्टाग्रामवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे पारनेर तालुक्यात त्याविरोधात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचा पारनेर तालुका मुस्लिम समाजाने निवेदन देऊन जाहीर निषेध केला. यासंबंधीचे निवेदन पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना लेखी स्वरुपात देण्यात आले.
यावेळी पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजूभाऊ औटी यांच्यासह माजी नगरसेवक मुदस्सीर सय्यद, नगरसेवक राजू शेख, नगरसेवक डॉ. सादिक राजे, डॉ. मुजाहिद सय्यद, अकील शेख, सोहेल शेख, मनसे शहरप्रमुख वसीम राजे, मतीन सय्यद, मोहसीन शेख यासीन राजे यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक डॉ. सादिक राजे व डॉ. मुजाहिद सय्यद म्हणाले की, पारनेर तालुका हा पुरोगामी विचारसरणीचा असल्यामुळे तालुक्यात जातीय सलोखा कायमच ठेवला जातो.
पारनेर तालुक्यात दोन्ही समाजाचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून कोणीतरी माथेफिरू सोशल मिडियाच्या माध्यमातून समाजातील तेढ निर्माण करण्याचे काम करत असेल तर अशा प्रवृत्तीचा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करून अशा प्रवृत्तींना योग्य ती शिक्षा द्यावी.
QNXOyLHlRxUzJhPu