दोन पाकीटमारांना श्रीगोंदा पोलिसांकडून अटक
श्रीगोंदा । वीरभूमी - 13-Jun, 2023, 01:07 PM
श्रीगोंदा बसस्थानकावर प्रवाशांचे पाकीट व गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने लांबणार्या दोन भुरट्या चोरांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2 जून रोजी श्रीमती विजया जालिंदर कदम (वय 59 वर्षे) रा. भैरवनाथ गल्ली, श्रीगोंदा यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, दि. 28 मे रोजी स्वारगेट ते जामखेड जाणार्या बसने श्रीगोंदा येथुन वालवड ता. कर्जत येथे जात असताना श्रीगोंदा बस स्थानकावर अज्ञात चोरट्याने पिशवीतील सोन्याचे गंठण चोरले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दि. 9 जुन रोजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांना माहिती मिळाली की हा गुन्हा श्रीगोंदा येथील अनिल रामदास अढागळे (रा. ससाणेनगर) याने केला आहे. निरीक्षक भोसले यांनी पोलीस पथक पाठवून आरोपी अढागळे यास अटक केली असता त्याने हा गुन्हा कबूल करून राजेंद्र उर्फ भारत रामु माने (रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) याची गुन्ह्यात मदत घेतली असल्याचे सांगितले. पोलिसांनी माने यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरलेले 28 गॅम वजनाचे सोन्याचे दागीने जप्त करण्यात आले आहेत.
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांनी यापूर्वी केलेले आणखी दोन गुन्हे उजेडात आले आहेत. दोन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार गोकुळ इंगवले करत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, सपोनि. समिर अभंग, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, गणेश साने, रविंद्र जाधव, नितीन शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
Comments