मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी
संगमनेर । वीरभूमी - 14-Jun, 2023, 12:53 PM
आळंदी येथे रविवारी वारकर्यांवर झालेली लाठीचार्जची घटना निंदनीय आहे. या घटनेची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व संबंधित पोलिस अधिकार्यांचे निलंबन करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली. संगमनेर बसस्थानकासमोर सोमवारी संगमनेर शिवसेना वारकरी भजनी मंडळाने घटनेचा निषेध करत आंदोलन केले.
शहर शिवसेनेने वारकर्यांसोबत दिंडी काढून भजन, कीर्तन करत शिंदे-फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी केली. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संस्कृतीला या घटनेने गालबोट लागले. फडणवीस मुख्यमंत्री असताना वारकरी व वारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आत्ता लाठीचार्जचे पुरावे असताना गृहमंत्री फडणवीस यांनी ही न घडलेली घटना आहे, असे सांगितले आहे.
त्यांना असे बोलताना काही वाटत नाही का? असा संतप्त सवाल कतारी यांनी उपस्थित केला. घटनाबाह्य सरकारने वारकरी संप्रदायाची माफी मागावी, अशी मागणी तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे, संजय फड, संपर्कप्रमुख नरेश माळवे, महिला आघाडीच्या शितल हासे, संदीप रहाणे, युवासेनेचे गोविंद नागरे यांनी यावेळी केली. उपशहर प्रमुख इम्तियाज शेख, वेणुगोपाल लाहोटी, संघटक दीपक साळुंके, अजीज मोमीन, विजय भागवत, वैभव अभंग, अमोल डुकरे, जना नागरे, मार्केट कमिटीचे सदस्य विजय सातपुते, अक्षय गाडे, महिला आघाडीच्या संगीता गायकवाड, आशा केदारी, योगेश बिचकर, सुदर्शन इटप, रवी गिरी, संतोष कुटे आदींसह पदाधिकारी व वारकरी यावेळी उपस्थित होते.
Comments