पारनेर । वीरभूमी - 14-Jun, 2023, 01:16 PM
शासनाच्या मोफत नवीन पाठ्यपुस्तके वाटपाच्या योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2023-24 ला पारनेर तालुक्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीची जवळपास 28105 पुस्तक संच शाळांमध्ये पोहोचली असून पहिल्याच दिवशी म्हणजे 15 जूनला शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वाटप केली जाणार आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी दिली. मागील वर्षी शासनाच्या धोरणानुसार द्विभाषिक शिक्षण पद्धतीसाठी पारनेर तालुक्याची निवड झाली होती.
यावर्षी मराठी माध्यमासह सेमी इंग्रजी माध्यमासाठीही एकात्मिक पाठ्यपुस्तके आलेली आहेत. ही सर्व पाठ्यपुस्तके इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकात्मिक पद्धतीने चार भागांत पथदर्शी स्वरूपात प्रकाशित करण्यात आलेली आहेत. यात सर्व विषय एकत्रित असून त्याचे चार भाग करण्यात आले आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे नक्कीच कमी होणार आहे.
मोफत पाठयपुस्तक सन 2023-24 मध्ये पारनेर तालूक्यातील 4े4 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 1 लाख 16 हजार 353 प्रती प्राप्त झाल्या असून त्या तालूका ते केंद्रस्तर व केंद्रस्तर ते शाळास्तरापर्यंत पोहोच झाले आहेत.
गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांच्या मार्गदर्शना खाली तालुका गट समन्वयक श्री नरसाळे, श्री. येवले व दत्ता आबेकर यांच्या सुक्ष्म नियोजनात गट साधन केंद्रातील सुरेश सोनवणे, किसन शिरसाट, श्रीमती राठोड, योगेश धुमाळ, श्री. बांडे, श्री. वांळूज, श्रीमती कराळे यांनी केद्रनिहाय वाटप नियोजन केले. यावेळेस तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, सहाय्यक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी यांनी सहकार्य केले.
पाठ्यपुस्तकात माझी नोंदसाठी कोरे पान
पाठ्यपुस्तकामध्ये यावर्षीपासून घटक संपल्यानंतर ‘माझी नोंद’ म्हणून वह्यांच्या पृष्ठांचा समावेश केलेला आहे. या पृष्ठांवर विद्यार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात. वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवावेत. वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी.
काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती, साहित्यांची नोंद घेणे. पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची.
पाठ्यपुस्तकांबाहेरील माहिती लिहून ठेवण्यासाठी. पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे. चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी. पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी या पृष्ठांचा वापर करावा.
rmCuRUyzDnoY