प्रभारी पोनि. म्हणुन प्रशिक्षणार्थी बी. चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती
शेवगाव । प्रतिनिधी - 19-Jun, 2023, 06:36 PM
शेवगाव शहरातील दगडफेकीच्या प्रकरणापासून चर्चेत आलेले शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रभारी पोलिस निरीक्षक म्हणुन प्रशिक्षणार्थी बी. चंद्रकांत रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना अहमदनगर नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.
पोनि. विलास पुजारी यांच्या बदलीचे आदेश आल्यानंतर काही राजकारण्यांनी आपले वजन वापरून त्यांना पुन्हा शेवगाव येथेच राहण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. शेवगाव शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. मागील काही दिवसापासून पोलिस प्रशासन चर्चेत आहे. यामध्ये शेवगाव शहर व तालुक्यात अवैध धंदे, अवैध वाळू उपसा, वेश्या व्यवसाय, मटका, अवैध दारु, खून, मारामार्या असे अनेक प्रकारची गुन्हेगारी वाढल्याने शेवगाव चर्चेत आले होते.
त्यातच छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. तेंव्हापासूनच पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांची बदली करण्यासाठी काही राजकारणी प्रयत्नात होते.
त्यातच दगडफेकीच्या घटनेला महिना होवून गेल्यानंतरही दगडफेक प्रकरणातील अनेक आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांना अटक करण्यात पोनि. विलास पुजारी यांना अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पोनि. विलास पुजारी चर्चेत आले होते.
पोनि. विलास पुजारी यांची संपूर्ण कारकिर्द ही असमाधानकार ठरल्याने त्यांच्या जागी प्रशिक्षणार्थी बी. चंद्रकांत रेड्डी यांची प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणुन नियुक्ती केली असून पोनि. विलास पुजारी यांना अहमदनगर नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत.
पोनि. विलास पुजारी यांचे बदलीचे आदेश मिळताच काहींनी आपले राजकीय वजन वापरुन बदली रद्द करण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांना कितपत यश मिळते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
r