प्रांताधिकारी प्रसाद मते यांचे आदेश । शेवगाव पोलिस निरीक्षकांनी दिला होता हद्दपारीचा प्रस्ताव
शेवगाव । प्रतिनिधी - 20-Jun, 2023, 11:32 AM
मागील काही दिवसापासून पोलिस व महसूल प्रशासनाला वेठीस धरणार्या विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॅलनी, शेवगाव) याला समाजविघातक कृत्ये व गुन्हेगारी वृत्तीमुळे जिल्ह्यातून हद्दपार करावा, असा प्रस्ताव शेवगाव पोलिसांनी पाथर्डी प्रांताधिकारी यांचेकडे दाखल केला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी विशाल विजयकुमार बलदवा याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.
विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव) हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वागण्यामुळे समाजविरोधी व विघातक कृत्यांना प्रोत्साहान मिळत आहे. त्याच्यावर कायद्याचे कुठल्याच प्रकारचे बंधन नसल्यासारखे तो शेवगाव शहरात व तालुक्यात धाडसी वृत्तीने वागत असल्याने लोकांमध्ये दहशतीचा व चिंतेचा विषय झाला आहे.
त्याच्या वागण्यामुळे स्थानिक व परिसरातील नागरीक आक्रमक भूमिका घेवून आंदोलन करणे, मोर्चा काढणे, रास्तारोको करणे असे प्रकार करण्याची शक्यता आहे. यामुळे शेवगाव शहराची व तालुक्याची शांतता व सुव्यवस्थेस भंग होण्याची दाट शक्यता आहे. तो कोणताही कामधंदा करत नसून त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक स्त्रोत नाही. तो कोणालाही जुमानत नसून गंभीर गुन्हे करण्याच्या सवयीचा झालेला आहे.
त्याच्या दबाव व भितीपोटी त्याच्या विरोधात कोणीही जबाब देण्यास तयार होत नाही. त्यामुळे विशाल बलदवा यास दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे, असा प्रस्ताव शेवगाव पोलिस निरीक्षकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव) याला अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
k5527f