प्रशिक्षणार्थी पोलिस अधकिार्यांची पहिलीच धडाकेबाज कारवाई
कत्तलीसाठी जाणार्या 22 गोवंशीय जनावरांची सुटका । 9 जणांना अटक
शेवगाव । प्रतिनिधी - 20-Jun, 2023, 03:03 PM
प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी शेवगाव पोलिस ठाण्याचा प्रभारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर पहिलीच धडक कारवाई केली आहे. तीन वाहनातून कत्तलीसाठी जाणार्या तब्बल 22 गोवंशिय जनावरांची सुटका करण्यात आली असून 9 जणांना अटक केली आहे. पहिल्याच दिवशी धडाकेबाज कारवाई केल्याने त्यांचे शेवगाव तालुक्यातून कौतूक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार दि. 20 रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान शेवगावकडून आखेगावकडे जाणार्या वाहनातून कत्तलीसाठी गोवंशिय जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याबाबत पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली. या माहितीवरुन पोलिस उपअधिक्षक सुनील पाटील यांनी प्रशिक्षणार्थी पोलिस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलिस निरीक्षक विलास पुजारी, सपोनि. आशिष शेळके यांचे पथक तयार करुन शेवगाव ते आखेगाव रोड रस्त्यावरील डॉ. अमित फडके यांच्या नविन बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी पाठविले.
त्या ठिकाणी पहाटे 5.30 वाजेच्या दरम्यान शेवगावहुन आखेगावकडे जाणारा टाटा एसी कंपनीचा टेम्पो (क्र. एमएच. 14, सीडी 21) चालक अशरफ रईस सौदागर (रा. खाटीक गल्ली, शेवगाव) याच्यासह टेम्पोमध्ये बसलेले साहील राजू कुरेशी, कैफ फैय्याज सौदागर (दोघे रा. दादेगाव रोड, शेवगाव) यांना ताब्यात घेतले. त्या पाठोपाठ आलेला टाटा एसी कंपनीचा टेम्पो (क्र. एमएच. 16, एवाय 2895) चालक सुनील बाळासाहेब चव्हाण (रा. वरुर, ता. शेवगाव) याच्यासह टेम्पोमध्ये बसलेले बाबा मुसा शेख (रा. खरडगाव, ता. शेवगाव), असिम फैय्याज सौदागर (रा. दादेगाव रोड, शेवगाव) यांना ताब्यात घेतले.
त्याचप्रमाणे तिसरे वाहन टाटा कंपनीचा 407 टेम्पो (क्र. एमएच 04, जीआर 5919) चालक फ्रान्सीस रामभाऊ चित्ते (रा. खरडगाव, ता.शेवगाव) याच्यासह टेम्पोमध्ये बसलेले सुभान फारुख सौदागर (रा. दादेगाव रोड, शेवगाव), ईशाद अब्बास सय्यद (रा. खाटीक गल्ली, शेवगाव) अशा 9 जणांना तीन वाहनासह ताब्यात घेवून तब्बल 22 गोवंशिय जनावरांना गोशाळेत पाठवून सुटका करण्यात आली.
वरील 9 जणांवर ताब्यातील वाहनातून 22 जनावरांना डांबून, दाटीवाटी करुन बसवून स्वतःचे फायद्याकरीता, गोमांस खरेदी-विक्री करण्याच्या हेतुने वाहतूक करतांना मिळून आल्याने त्यांचेवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-1995 चे कलम 5 (अ) (ब), 9 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम-1995 चे कलम 3, 11 प्रमाणे शेवगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोनि. विलास पुजारी, सपोनि. आशिष शेळके, सपोनि. विश्वास पावरा, पोना. रवींद्र शेळके, पोना. सुधाकर दराडे, पोकॉ. राहुल खेडकर, चालक पोकॉ. पांडुरंग मनाळ, पोकॉ. सुनील रत्नपारखी, पोकॉ. संपत खेडकर, चालक पोना. सुजीत सरोदे, पोकॉ. वैभव काळे यांच्या पथकाने केली.
प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी शेवगाव पोलिस ठाण्याचा प्रभारी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिशी धडाकेबाज कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोना. सुखदेव धोत्रे हे करीत आहेत.
oVRuxpEFTO