मढेवडगाव येथील घटना । संशय व्यक्त करत मालकावरच खुनाचा गुन्हा दाखल
श्रीगोंदा । वीरभूमी- 19-Jul, 2023, 10:59 AM
मढेवडगाव येथील शेतकर्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून कामाला असलेल्या एरंडोली येथील समाधान अंकुश मोरे (रा. एरंडोली) या युवकाने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अहवालात आत्महत्या केल्याचा अहवाल आला होता. मात्र युवकाचे नातेवाईक व एरंडोली ग्रामस्थांनी खुनाचा संशय व्यक्त केल्यामुळे मृतदेहाचे पुन्हा पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर अहवालात तफावत आढळल्यामुळे ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर मढेवडगाव येथील सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 14 रोजी मढेवडगाव येथील दिलिप गणपत मांडे या शेतकर्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असलेल्या एरंडोली (ता. श्रीगोंदा) येथील समाधान अंकुश मोरे (वय 19 वर्षे) या तरुणाने दि. 14 रोजी आत्महत्या केली होती. या तरुणाचे श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्राथमिक अहवालात आत्महत्या केली असल्याचे निष्पन्न झाले. मात्र तरुणाचे कुटुंबीय व एरंडोली ग्रामस्थांनी खून झाल्याचा संशय व्यक्त करून चार दिवस श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचा आग्रह धरला.
ग्रामस्थांच्या दबावामुळे श्रीगोंदा पोलिसांनी मृतदेहाचे परत पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले. ससून रुग्णालय व श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयाच्या अहवालात तफावत आढळल्यामुळे श्रीगोंदा पोलिसांनी मयत तरुणाची आई सौ. रुपाली अंकुश मोरे यांच्या फिर्यादीवरून सोमवार दि. 17 रोजी रात्री दिलीप गणपत मांडे, पाडुंरग उंडे, प्रविण दिलीप मांडे, अभि दिलीप मांडे, बाळासाहेब मांडे, अक्षय त्रिंबक मांडे, आकाश बाळासाहेब मांडे (सर्व रा. मढेवडगाव, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध संगनमताने खुन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी समक्ष भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करत आहेत.
वैद्यकिय अधिकारी, पोलिसांवरही नातेवाईकांचा आरोप : श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय आणि पुणे येथील ससून रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर आलेल्या दोन वेगवेगळ्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तरुणाचे नातेवाईक व एरंडोली ग्रामस्थांनी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयातील शव विच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस कर्मचार्यांवर आरोप करत या प्रकरणात आरोपी करण्याची मागणी करत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.
VqvmjMoShaNn