अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल । चोरीचा तपास लावण्याचे शेवगाव पोलिसांसमोर आव्हान
शेवगाव । वीरभूमी - 20-Jul, 2023, 10:37 AM
शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथील शनिमंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बुधवार दि. 19 रोजी सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थांनी शोध घेतला असता दानपेटी जवळच असलेल्या उसाच्या शेतात फोडलेल्या स्थितीत आढळली. याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवगाव तालुक्यातील ताजनापूर शिवारात असलेले शनिमंदिर परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे शनिवार, आमवस्या व इतर दिवशी भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यातच सोमवार दि. 17 रोजी आमवस्या असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
दर्शनासाठी आलेले भाविक मंदिरातील दानपेटीमध्ये सढळ हाताने दानही करत असतात. त्यातच सोमवती आमावस्या असल्याने दानपेटीमध्ये मोठी रक्कम जमा झाली असावी. असा अंदाज बांधून अज्ञात चोरट्यांनी बुधवारी रात्री मंदिरातील दानपेटी पळवून नेऊन शेजारीच असलेल्या ऊसामध्ये नेहुन फोडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बुधवारी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान शनि मंदिराचे पुजारी मुकुंद उत्तमराव मुळे हे नेहमीप्रमाणे शनिदेवाच्या पुजेसाठी गेले असता मंदिराच्या आवारात असलेली दानपेटी त्यांना दिसली नाही. याबाबत त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. या घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी मंदिर परिसरात गर्दी केली.
चोरीस गेलेल्या दानपेटीचा ग्रामस्थांनी शोध घेतला असता जवळच असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये दानपेटी फोडलेल्या स्थितीत आढळून आली. दरम्यान शेवगाव पोलिसांना चोरीच्या घटनेबाबत कळविल्यानंतर परिविक्षाधिन सहाय्यक पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फोडलेल्या दानपेटीची व मंदिर परिसराची पाहणी केली.
दरम्यान ताजनापूर येथील शेतकरी आप्पासाहेब किसन वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात शनिमंदिरातील दानपेटी पळवून नेत ती फोडून सुमारे 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिमंदिरातील दानपेटी फोडल्याने ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असून चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने शोध घेण्याची मागणी ताजनापूर ग्रामस्थांनी केली आहे.
gERjXHsKVLJm