दक्षिण लोकसभेसाठी विखे विरुद्ध थोरात लढत?
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सूर । राष्ट्रवादीने काँग्रेससाठी जागा सोडावण्याची मागणी
महादेव दळे । डावपेच- 14-Aug, 2023, 02:17 PM
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र मागील काही निवडणुका राष्ट्रवादीचा सलग पराभव झाला आहे. त्यातच भाजपाचे खा. सुजय विखे यांना टक्कर देण्यासाठी आ. निलेश लंके यांनी नियोजन करत विखेंना तुल्यबळ लढत देवू शकेल असा उमेदवार म्हणुन जनभावना निर्माण केली होती. मात्र अजितदादा पवार हे भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर आ. निलेश लंकेही अजितदादा’सोबत जात सत्तेत सहभागी झाले. यामुळे खा. सुजय विखे यांच्या विरोधात कोणता उमेदवार लढत देईल अशा चर्चा सुरु झाल्या.
त्यातच काँग्रेसने शिर्डीसह दक्षिणेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त करत दक्षिण लोकसभेची जागा माजी महसूल मंत्री तथा विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी लढविण्याची मागणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केली. यामुळे राष्ट्रवादीने दक्षिण लोकसभेची जागा काँग्रेसला दिली तर खा. सुजय विखे विरुद्ध आ. बाळासाहेब थोरात अशी तुल्यबळ लढत होईल? असा मतदारामधून अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. यासाठी प्रत्येक मतदार संघात मेळावे, बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच काँग्रेसने रविवारी शिर्डी व नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक निरीक्षक चंद्रकांत हंडोरे यांनी आढावा बैठक घेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी शिर्डी व नगर दक्षिण मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या व दक्षिणेतून विधीमंडळ नेते आ. बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.
मागील निवडणुकीच्या तोंडावर विखे यांनी भाजपात प्रवेश करुन नगर दक्षिणमध्ये डॉ. सुजय विखे यांनी निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळविला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आल्याने पारनेरचे आ. निलेश लंके यांनी राष्ट्रवादीकडून नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली. यासाठी त्यांनी गावागावात निलेश लंके प्रतिष्ठाणच्या शाखा स्थापन करुन तरुणांचा पाठिंबा मिळवण्यात यश मिळवले.
या दरम्यान दक्षिणेतील विकास कामांसाठी उपोषण, आंदोलनाचे हत्यार उपसून खा. सुजय विखे यांना शह देण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात आ. लंके यांची भूमिका पाहुन खा. विखे यांना ते तुल्यबळ लढत देवू शकतील अशी जनभावना तयार करण्यात यशस्वी झाले. मात्र मागील काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अजितदादा पवार भाजपासोबत जावून सत्तेत सहभागी झाले. त्यापाठोपाठ आ. निलेश लंके यांनीही अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेत सत्तेत सहभागी झाले. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी खा. विखे यांना तुल्यबळ लढत कोण देवू शकेल? याची चर्चा सुरु झाली. त्यातच काँग्रेसने शिर्डीसह दक्षिणेची जागा मागत आ. बाळासाहेब थोरात यांनी लढवावी, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली.
विखे-थोरात यांचे राजकीय वाद सर्वश्रुत आहे. यामुळे राष्ट्रवादीने मागील काही पराभव पाहता काँग्रेसला जागा सोडली तर विखे - थोरात अशी तुल्यबळ लढत होईल अशी चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे.
दक्षिणेची जागा जिंकू ः राजेंद्र नागवडे यांचा विश्वास : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान निवडणुकीत आ. बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे यांचा धोबीपछाड दिली आहे. थोरात-विखे संघर्ष व संगमनेरचा झालेला विकास, प्रामाणिक भूमिका आणि गटतट न करता जिल्ह्यातील सर्व नेत्यांबरोबर असलेले सलोख्याचे संबध या आ. थोरात यांच्या जमेच्या बाजू आहेत. मविआला असलेले जनसमर्थन व त्यांची प्रतिमा या बळावर आपण दक्षिणेची जागा जिंकू असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला.
दक्षिणेतही आ. थोरातांचा दांडगा संपर्क व नातेसंबध : नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील पारनेर, कर्जत-जामखेड, नगर शहर, राहुरी या विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर श्रीगोंदा व शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात भाजपाचे वर्चस्व आहे. मागील निवडणुकीत खा. सुजय विखे यांना सर्वाधिक मताधिक्य शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून मिळाले होते. हे माताधिक्य कमी करण्याच्या हेतूने आ. निलेश लंके यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले होते. त्याप्रमाणे आ. बाळासाहेब थोरात यांचा नगर दक्षिण जिल्ह्यातील संपर्क व नातेसंबध पाहता निवडणूक लढविण्याचा अंदाज आहे.
तर संगमनेर विधानसभेसाठी डॉ. जयश्रीताई थोरात यांना संधी : संगमनेर विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी आतापर्यंत एकहाती वर्चस्व राखले आहे. त्यातच त्याची कन्या कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी एकवीरा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कामात ठसा उमटविलेला आहे. आता त्यांना राजकीय संधीची गरज आहे. यामुळे दक्षिण लोकसभा आ. बाळासाहेब थोरात यांनी लढविली तर संगमनेर विधानसभा मतदार संघात डॉ. जयश्रीताई थोरात यांना संधी मिळू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
dnNqQXBYoPc