पाथर्डी । वीरभूमी - 01-Sep, 2023, 12:52 PM
डायल 112 वर फोन करून मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, त्यांना फोन द्या, मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी धमकी देत पोलिसांची दिशाभूल करत सार्वजनिक सुरक्षेस बाधा येईल, असे कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धमकीच्या फोननंतर प्रशासनाची एकच धांदल उडाली. मात्र पोलिसांनी आरोपीचा शोध घेवून त्याला तातडीने अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केल्यानंतर त्याची तपासणी केली असला त्याने हे कृत्य दारुच्या नशेत केल्याचे समोर आले आहे. मात्र या घटनेने मंत्रालयातील यंत्रणा सतर्क झाली असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2.20 वा. पाथर्डी पोलिस ठाण्याच्या डायल 112 वर फोन आला की, ‘मी मंत्रालयात बॉम्ब ठेवला असून, मला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे आहे, असे एका व्यक्तीने माहिती दिली. ही माहिती नीट समजली नसल्याने व सतर्कता म्हणुन वरीष्ठांना कळविण्यात आली. मं तालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीने यंत्रणा सतर्क झाली. मंत्रालयातील सुरक्षा वाढविण्यात आली.
दरम्यान पाथर्डी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोना. निलेश म्हस्के, पोना. अल्ताफ शेख यांच्या पथकाने फोन करणार्या व्यक्तीचा शोध सुरु केला. फोन करणारा हा शेवगाव तालुक्यातील असल्याचे समजल्यानंतर शेवगाव पोलिसांच्या मदतीने बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
डायल 112 वर ज्या नंबर वरुन फोकन आला होता, त्या क्रमांकावर फोन केला असता ढाकणे याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पोलिसांनी सदर इसमाचा शोध घेतला असता, तो बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (वय 34, रा. हसनापूर, ता. शेवगाव) येथील असून, त्यास शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाल्याने त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथून ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस स्टेशनला आणले.
सदर इसम दारूच्या अंमलाखाली असल्यासारखा वास आल्याने त्याची पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. तपासणी केली असता, तो दारूच्या अंमलाखाली असल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिकार्यांनी दिला असल्याचे समजते.
मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी पोना. निलेश म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (रा. हसनापूर, ता. शेवगाव) याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढाकणे याने दारुच्या नशेत धमकी दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना असून अधिक तपास सुहास बटुळे हे करीत आहेत. मात्र या धमकीमुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली असून सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
hIFJtUXdpVTG