महावितरणच्या गलथान कारभारा विरोधात ग्रामस्थ उपोषण करणार
श्रीगोंदा । वीरभूमी - 01-Sep, 2023, 01:14 PM
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील गावठाण हद्दीतील रोहित्र गेल्या महिन्याभरात तीन वेळा जळाल्यामुळे वीजेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी महावितरण विरोधात 7 सप्टेंबर रोजी बेलवंडी येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
घोटवी गावातील महिला व पुरुष गुरूवार दि. 31 ऑगस्ट रोजी बेलवंडी येथील उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर रोहित्र दुरुस्तीसाठी ठाण मांडून बसले होते. कोणत्याही परिस्थितीत गावचा विजेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. परंतु उपअभियंता श्री. मापारी हे काही कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांची भेट झाली नाही.
घोटवी येथील गावठाण हद्दीतील रोहित्र तीन वेळेस बदलून आणला आहे तरी तो खराब होत आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून गाव अंधारात असून गावातील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे असे ग्रामपंचायत सदस्य नारायण निंभोरे यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी निवेदन देऊनही महावितरणला जाग आली नाही त्यामुळे दि.7 सप्टेंबर रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे महावितरण विभाग, तहसीलदार श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलीस ठाण्याला दिला आहे.
यावेळी घोटवीचे सरपंच अविनाश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य नारायण निंभोरे, अनिल काळे, अक्षय शिंदे, चेअरमन दादासाहेब बारगुजे,व्हा. चेअरमन बिभीषण निंभोरे, काशिनाथ बारगुजे, बाळासाहेब कदम, कचरू कदम, सादिक पठाण, रोहित काळे, एकनाथ धस, योगेश खरात यांच्यासह महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
UmypoqXjg