पाथर्डी । वीरभूमी - 01-Sep, 2023, 01:20 PM
पाथर्डी तालुक्यात अनाधिकृत सेतू केंद्राचे पेव फुटले असून अनेक अनधिकृत सेतू केंद्र सध्या तालुक्यात कार्यरत असून या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. सध्या राज्यात शासकीय नोकर भरती मोठ्या प्रमाणात चालू असून यासाठी लागणारे विविध दाखल्यासाठी तरुणांची या ठिकाणी मोठी गर्दी असते त्यांची ही आर्थिक लूट या ठिकाणी होत आहे.
लोकसेवेसाठी सरकारने उभारलेल्या या योजनेमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. सर्वसामान्य जनतेच्या या आर्थिक पिळवणुकीमध्ये महसूल विभागाचाही काही सहभाग आहे का हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे अनाधिकृत सेतू केंद्र बंद करून जनतेची व शासनाची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी अनेक अधिकृत सेतू चालकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर बाबासाहेब चौधर, शारदा गरुड, सुदाम जायभाये, आनंद रंधवे, संभाजी म्हस्के, रंगनाथ चितळे, ज्ञानेश्वर गव्हाणे, जीवन बडे, विजय ढाकणे, अजय रक्ताटे, हरेश केदार, रवींद्र शिवणकर, संभाजी चितळे, सचिन मरकड, संदीप काजळे आदींच्या निवेदनावरती स्वाक्षर्या आहेत.
या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात महा-ई-सेवा केंद्राचे अधिकृत असे 23 केंद्र असून त्यापैकी 19 सेतू केंद्र आज पर्यंत चालू आहेत. परंतु शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑपरेटरच्या नावाने आपले सरकार सेवा केंद्र मंजूर केलेले आहे.
परंतु ग्रामपंचायत ऑपरेटर हे त्यांना दिलेला आयडी त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये न चालवता, तालुक्याच्या ठिकाणी किंवा जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये अनधिकृतपणे चालवत आहेत. किंवा दुसर्यांना भाडेतत्त्वावर देऊन अनधिकृतपणे एजंट तयार केलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अधिकृत सेतू चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामपंचायत ऑपरेटरांना शासन दरमहा सात हजार रुपये मानधन देत आहे तरी ते ग्रामपंचायत मध्ये न बसता तालुक्याच्या ठिकाणी किंवा जास्त लोकसंख्येच्या गावी आयडी चालवत आहेत. तसेच अनेकांची आयडी हे अनेक ठिकाणी चालू आहे.
असे अनधिकृत सेतू केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा सेतू केंद्र, जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
Comments