बोत्रे कुटुंबीयांनी केले धूमधडाक्यात मिल रोलर पूजन । तालुक्याच्या साखर धंद्यात बोत्रे कुटुंबीयांची एंट्री
विजय उंडे । वीरभूमी - 02-Sep, 2023, 08:11 AM
श्रीगोंदा : तालुक्यताील हिरडगाव येथील साईकृपा साखर कारखान्याची मालकी बदलल्यानंतर गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रा. लि. युनीट नं. 4 या कारखान्याच्या 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामासाठी मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम शुक्रवार दि. 1 रोजी कारखान्याच्या चेअरमन गौरीताई बाबुराव बोत्रे पाटील, ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील, रेखा बोत्रे पाटील व कारखान्याचे संचालक ओमराजे बाबुराव बोत्रे पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कारखाना संचालकांच्या हस्ते नव्या अद्ययावत डिस्टिलरी भुमिपुजनाचा कार्यक्रमही संपन्न झाला.
यावेळी गौरी कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहिदास यादव, हिरडगावचे मान्यवर संपत दरेकर, मिलींद दरेकर, संतोष दरेकर, राजू दरेकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कामगार उपस्थित होते. यावेळी मिलिंद दरेकर यांनी शुभेच्छा देताना म्हटले की, तालुक्यातील पूर्व भागाला न्याय देण्यासाठी आ. बबनराव पाचपुते यांनी जे स्वप्न पाहिले होते ते पुर्ण करण्यासाठी हिरडगावकर बोत्रे यांना पुर्ण सहकार्य करणार असल्याची ग्वाह देतो. जनरल मॅनेजर रोहीदास यादव यांनी यावेळी कामगारांना व खातेप्रमुखांना कारखाना गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले.
ओंकार गृपचे चेअरमन बाबुराव बोत्रे यांनी सर्व पंचक्रोशीतील शेतकरी, कामगार व सर्व खातेप्रमुखांना कारखान्याचा यशस्वी हंगाम होण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक व पूर्ण क्षमतेने योगदान देण्याचे आवाहन केले. यावर्षी 9 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असून सर्वांच्या कष्टातून हे साध्य होणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी मिल रोलर पूजन कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रशांत व शारदा बोत्रे यांच्या हस्ते अद्ययावत डीस्टीलरी प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.
गौरी शुगर जिल्ह्यात एक नंबरचा भाव देवून आ. पाचपुते यांचे अधुरे स्वप्न प्रत्यक्षात उतरवून दाखवू ः बाबुराव बोत्रे
आ. बबनराव पाचपुते यांनी 10 हजार टनी साईकृपा कारखान्याची निर्मिती करताना येथील शेतकर्यांच्या ऊसाला जिल्ह्यात सर्वाधिक भाव देण्याचे स्वप्न पाहिले. मात्र दुर्दैवाने ते त्यांचे स्वप्ने 12 वर्षाच्या तपानंतरही अपुरे राहिले. आम्ही राज्यात साखर धंद्यात दोन नंबरवर आहोत. राज्यात अजितदादा साखर धंद्यात एक नंबरवर आहेत. त्यामुळे आम्ही दुसर्या क्रमांकावर राहण्याला कायमस्वरूपी पसंती देऊ, मात्र जिल्ह्यात सर्वाधिक एक नंबरचा भाव देऊन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना आनंदाचे दिवस आणून आ. पाचपुते यांच्या 12 वर्षाच्या तपाचे चीज करून दाखवू असे यावेळी बाबुराव बोत्रे म्हणाले.
Comments