पारनेरच्या लेकींनी केली कमाल, देश सेवेत होतील बेमिसाल
पारनेरच्या तीन तरुणी भारतीय नौसेनेत दाखल । सर्वत्र होतेय कौतुक
लतिफ राजे । वीरभूमी - 02-Sep, 2023, 11:21 AM
पारनेर : पारनेर तालुका म्हटले की, दुष्काळी भाग डोळ्यासमोर येतो. तरी पण यावर मात करून येथील तरुणाईने राज्याला शिक्षक पुरविणारा तालुका अशी ओळख निर्माण केली. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेकांनी प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी या पदांना गवसणी घातलेली पाहायला मिळते. यात मुलांप्रमाणेच मुली ही आघाडीवर आहेत, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. यातच पारनेरच्या तीन लेकींनी भारतीय नौसेनेत दाखल होत पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
यामध्ये पारनेर येथील तराळवाडीची शुभांगी देवेंद्र बढे, वडनेर हवेलीची अंतरा अरुण रेपाळे तर पिंपरी जलसेनची दिव्या सतीश अडसरे या तिघींची या ठिकाणी निवड झाली आहे. देशभरातून जवळपास 273 मुलींची निवड झाली होती त्यात या पारनेरच्या तीन लेकी आहेत. बहुतेक पारनेर तालुक्यातील नौसेनेत निवड होणार्या त्या सर्वप्रथम आहेत. 4 सप्टेंबर 2023 पासून या पारनेरच्या लेकी भारतीय नौसेनेत आपल्या देशसेवेला सुरुवात करीत आहे.
पारनेर येथील सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल बडे यांची नात शुभांगी देवेंद्र बढे हिने व तिघी मैत्रिणीने अग्निवीर जाहिरात वाचल्यानंतर भारतीय नौसेनेचे फॉर्म भरले होते व त्यामध्ये त्या तिघीही कॉलेज मैत्रिणी यशस्वी होऊन भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती. शुभांगी बढेच्या वडीलांचे 2021 साली कोरोनामध्ये निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळलेले असताना शुभांगीने हार न मानता ती नौसेनेच्या प्रशिक्षणासाठी 11 नोव्हेंबर 2022 रोजी ओडीसा येथील आयएनएस चिल्का या ठिकाणी हजर झाली.
शुभांगी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणार नाही अशी भीती घरच्यांना वाटत असताना तिने चार महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये पोहणे, फायरिंग, बोट पोलींग, खेळणे, ड्रीलचे कठीण असे चार महिन्याचे प्रशिक्षण होते. त्यानंतर गुजरातमधील आयएनएस वलसुरा येथे जहाजाशी संबंधित माहितीचे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केले.
चार चार महिन्यांच्या या दोन्ही प्रशिक्षणामध्ये पास झाल्यानंतर आता तिची नियुक्ती केरळमधील आयएनएस कोची येथे झाली असून 4 सप्टेंबर पासून ती आपल्या देशसेवेच्या कर्तव्याला सुरुवात करीत आहे. आपल्या कुटुंबांचा आधार बनत शुभांगी ग्रामीण भागातील सर्व मुलींसाठी एक प्रेरणास्थान होत आहे. पारनेरच्या या तीन लेकी आपल्या देशाच्या सागरतटाच्या सिमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावतील यात शंकाच नाही. यासाठी त्यांना सर्व भारतीयांकडून हार्दिक शुभेच्छा.
पारनेर मधील शुभांगी प्रमाणेच वडनेर हवेली येथील शेतकरी कुटुंबातील अंतरा अरुण रेपाळे हीच पण नौसेनेत निवड झाली आहे. आई वडील शेती करतात, मात्र पहिल्यापासूनच तिला देशसेवेची आवड असल्याने तिनेही नौसेनेसाठी अर्ज केला होता. तिची निवड झाल्यानंतर तिने ओडीसा येथील आयएनएस चिल्का येथे आपले चार महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील प्रशिक्षण केरळ येथील आयएनएस कोची येथे पूर्ण झाले आहे. 4 सप्टेंबर रोजी शुभांगी ही आपल्या देश सेवेला ओडीसा येथील आयएनएस चिल्का येथून सुरुवात करणार आहे.
पारनेर तालुका हा दुष्काळी जरी असला तरी येथील तरूणाई ही ध्येयवेडी आहे. पिंपरी जलसेन येथील शेतकरी कुटुंबातील दिव्या सतीश अडसरे ही आपल्या मैत्रिणींबरोबर देशसेवेचे व्रत घेऊन होती. देशभरातून नौसेनेसाठी 273 मुलींच्या निवडीमध्ये तिचा नंबर लागल्याने घरात आनंदीआनंद झाला होता. दिव्या हिने उडीसा येथील आयएनएस चिल्का येथे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण केले तर त्यानंतरचे प्रशिक्षण केरळ येथील आयएनएस कोची येथे पूर्ण केले. तीही 4 सप्टेंबर रोजी गुजरात मधील आयएनएस वलसुरा येथून आपल्या देशसेवेच्या कर्तव्याला सुरुवात करणार आहे.
Comments