विजय उंडे । वीरभूमी - 01-Oct, 2023, 01:20 PM
श्रीगोंदा : मढेवडगाव ते श्रीगोंदा कारखाना दरम्यान असलेल्या महादेवी वस्तीजवळील म्हातारपिंप्री हद्दीतील घोड डावा कालव्याचा मोर्याचा पुल शुक्रवारी कोसळला. नुकत्याच झालेल्या आवर्तनकाळात हा पूल कोसळला असता तर कालवा फुटून अनेक शेतकर्यांच्या कालव्या लगतच्या शेकडो एकर शेतजमिनी व उभी पिके वाहून जाऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले असते.
याबाबत आठ महिन्यांपूर्वी गेल्या फेब्रुवारी महिन्यात दै. वीरभूमीने पडझड झालेल्या पुलाची बातमी देऊन पाटबंधारे विभागाला जाग आणली होती. याची घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मारूती ठणके यांनी लागलीच दखल घेऊन याबाबत कुकडी पाटबंधारे विभाग व अधिकार्यांना धोका लक्षात आणून दिला होता. कार्यकारी अभियंता व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्यक्ष भेटही दिली होती. मात्र प्रशासनाच्या लालफितीत कागदपत्रे अडकल्याने या पुल दुरुस्तीसाठी अजुनही मुहूर्त सापडला नाही.
श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्याला समृद्धीकडे नेऊन लोकांचे जीवनमान उंचावणार्या घोड धरणाच्या डावा कालवा व चार्यांची आज वयपरत्वे जीर्ण अवस्था झाल्याने कालव्यावरील पुल व वितरिकांची दुरावस्था झाली आहे. अनेक ओढ्यांवरील पुलाच्या मोर्यांच्या भिंती ढासळत असून घोड व कुकडी पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शेतकर्यांच्या शेतजमिनीला मोठा धोका निर्माण झाला आहे.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1953 साली धरणाची मुहूर्तमेड रोवून 1965 पर्यंत काम चालले. धरणाचे पाहिले आवर्तन 1968 साली झाले. 7.5 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात दोन टीएमसी मृतसाठा आहे. उपयुक्त 5.5 टीएमसी पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 36 गावे व कर्जत तालुक्यातील 19 गावे बागाईत झाली.
अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना, नागवडे साखर कारखाना, घोडगंगा साखर कारखाना, श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी सारख्या मोठया गावांची पाणीपुरवठा योजना व रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत याच धरणावर अवलंबून आहे. पण पाटबंधारे खात्याच्या कासवगतीच्या कारभारामुळे आज पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरण, कालवा व वितरीकांची केविलवाणी अवस्था झाली आहे.
दोन वर्षापुर्वीच्या नुकसानीची आठवण : दोन वर्षापूर्वी चिंभळा परिसरात कालवा फुटल्याने अनेक शेतकर्यांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या. त्यात अनेक शेतकर्यांचे न भूतो न भविष्यती नुकसान झाले होते. त्यातच आता म्हातारपिंप्री हद्दीतील कोसळलेला पुल दुरुस्त न केल्यास येणारे रब्बी आवर्तन लांबण्याची चिन्हे आहेत.
येत्या आवर्तना अगोदर पुलाची दुरुस्ती होणार ः अभियंता ठणके : घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मारूती ठणके यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की दै. वीरभूमीने आठ महिन्यांपूर्वी पुलाची दुरावस्था निदर्शनास आणून दिली होती. मी तातडीने याबाबत वरिष्ठांना कळवले होते. या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया करून कामाची परवानगी देण्यात आली आहे. येत्या आवर्तनाआधी पुलाची तातडीने दुरुस्ती करणार आहोत.
Comments