श्रीगोंदा तालुक्यातील सात गावांमध्ये मतदारांनी कारभारी बदलले
विकासापेक्षा तत्कालिक लाभाला मतदारांची पसंती
विजय उंडे । वीरभूमी - 07-Nov, 2023, 04:28 PM
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायतींनी कारभारी बदलुन सत्तापरिवर्तन केले. तर लोणी व्यंकनाथ आणि देवदैठण या दोन ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी सत्ताधार्यांना पुन्हा संधी दिली आहे. एकूण दहापैकी आधीच घुटेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे तर निवडणूक झालेल्या नऊपैकी आ. पाचपुते गटाने तीन, जगताप व नागवडे गटाने प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींची सत्ता मिळवली आहे.
तर एक ग्रामपंचायत स्थानिक आघाडीने काबीज केली. तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी काल झालेल्या निवडणुकीची सोमवार दि.6 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. विसापूरच्या सरपंच निवडणुकीत नागवडे गटाच्या रुपाली जठार (614) यांनी बाजी मारली. सदस्यांमध्ये आ.पाचपुते, जगताप व नागवडे तीनही गटांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या.
देवदैठण येथे आ. पाचपुते गटाच्या जयश्री विश्वास गुंजाळ(2206) यांनी सुनीता वाघमारे (1129) यांचा 1 हजार 77 मतांनी पराभव केला. पाचपुते गटाने अकरापैकी 8 जागा जिंकत पाचपुते गटाने बहुमतही मिळवले. टाकळी लोणार येथे जगताप गटाच्या अर्चना दरवडे (997) यांनी मीना मते (719) यांचा 278 मतांनी पराभव केला. तिथे अकरापैकी 7 जागा जिंकत जगताप गटाने बहुमत मिळवले.
अधोरेवाडी येथे अशोक येडे यांच्या मंडळाचे अजित लकडे (452) यांनी महेश कोथिंबीरे (439) यांचा तेरा मतांनी पराभव केला. तिथे येडे यांच्या मंडळाने सातपैकी चार जागा जिंकत बहुमतही मिळवले. पेडगाव येथे जगताप गटाच्या इरफान पिरजादे (1579) यांनी सुनील खेडकर (1229) यांचा 350 मतांनी पराभव केला. तिथे जगताप गटाने तेरापैकी आठ जागा जिंकत बहुमत मिळवले.
मढेवडगाव येथे नागवडे गटाच्या प्रमोद शिंदे (1360) यांनी संग्राम शिंदे (1349) यांचा अकरा मतांनी पराभव केला. मढेवडगाव येथे तेरापैकी दहा जागा जिंकत नागवडे गटाने बहुमतही मिळवले. कोळगाव येथे पाचपुते गटाच्या पुरुषोत्तम लगड (4092) यांनी जगताप-नागवडे गटाच्या हेमंत नलगे (3601) यांचा 491 मतांनी पराभव केला. तिथे सतरापैकी 11 जागा जिंकत पाचपुते गटानेच बहुमत मिळवले.
लोणी व्यंकनाथ येथे मनीषा नाहाटा(2747) यांनी पाचपुते-नागवडे गटाच्या प्रतिभा नगरे (2494) यांचा 253 मतांनी पराभव केला. लोणीत सतरापैकी 11 जागा जिंकत नाहाटा गटाने वर्चस्व कायम राखले. आनंदवाडी येथे आ. पाचपुते गटाच्या छाया ढमढेरे (961) यांनी कमल नलवडे (898) यांचा 63 मतांनी पराभव केला. तिथे अकरापैकी पाच जागा जिंकत आ. पाचपुते गटाने बहुमत मिळवले.
कामठी येथील सदस्य पदाच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाऊसाहेब आरडे यांनी अंकुश शिंदे यांचा पराभव केला. तर राज्यात आदर्श गाव म्हणून नावाजलेल्या मढेवडगांव येथे विकासाचे रोल मॉडेल निर्माण केलेल्या प्रा. फुलसिंग मांडे यांच्या पॅनलला धूळ चारत प्रमोद शिंदे यांनी सत्ता खेचून आणली.
उमेदवारांनी पैशाचा धुरळा उडवला : दिवाळीच्या तोंडावर असलेल्या या निवडणुकीत किराणा किटने महिला मतदारांना भुरळ पाडली. तर गावाला आदर्श करणार्या गावकारभार्यांना गावातील बेरकी राजकारण करणार्या नेत्यांनी संपवण्याचा विडाच उचलला होता. त्यामुळे जनतेलाही विकासाचे वावडे पडले आहे की काय असा प्रश्न उपस्थित होत होत आहे. लोकशाहीची ही दुरावस्था अराजकाकडे चालल्याची नांदी ठरणार आहे.
Comments