पोलिस प्रशासनात मोठी खळबळ । पळालेले कैदी गंभिर गुन्ह्यातील
संगमनेर । वीरभूमी- 08-Nov, 2023, 12:32 PM
संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या जेलच्या खिडकीचे गज कापून चार कैद्यांनी पलायन केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवार दि. 8 नोव्हेंबर रोजीच्या पहाटे साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली आहे.
कैद्यांनी पलायन केल्याच्या घटनेनंतर पोलिसांची विविध पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. पलायन केलेल्या कैद्यामध्ये राहुल काळे, मच्छिंद्र जाधव, रोशन थापा ददेल आणि अनिल काळे यांचा समावेश आहे. जेलमधून पलायन करण्यासाठी आरोपींनी नियोजनबद्ध कट केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील चारही आरोपींना संगमनेर जेलमध्ये ठेवण्यात आले होते. नेहमीप्रमाणे जेलच्या बंदोबस्तासाठी तीन पोलिस कर्मचार्यांची नेमणुक करण्यात आली होती. दरम्यान आरोपींनी गज कापण्यावेळी मोठ्याने आवाजात गाणे वाजवण्यात आली. या आवाजात खिडकेचे गज कापून आरोपींनी पलायन केले. विशेष म्हणजे याचवेळी बाहेर एक कार उभी होती. त्या कारमधूनच हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. यामुळे पळून जाण्याचा कट नियोजन बद्ध केल्याचा पोलिसांना संशय आहे.
संगमनेर जेलमध्ये अनेकवेळा क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवले जातात. तसेच जेलमधील कैद्यांना बाहेरचे जेवण, गुटखा, तंबाखू, मोबाईल अशा सुविधा सहजतेने उपलब्ध होतात. यामुळेच जेलमधून पळून जाण्यात चार कैदी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
जेलमधून कैदी पळाल्याच्या घटनेनंतर बंदोबस्तावर असलेल्या कर्मचार्यांनी याबाबतची माहिती तातडीने वरीष्ठांना कळविली. यानंतर आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करुन वेगवेगळ्या भागात पाठविली आहेत. मात्र पळून गेलेले कैदी हे गंभिर गुन्ह्यातील आरोपी असल्याने त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान संगमनेर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
Comments