कर्जत । वीरभूमी - 09-Nov, 2023, 12:34 PM
कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कर्जत नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचार्यांचा मोठा वाटा असून त्यांचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. गरीब-वंचित कर्मचार्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी मोफत फराळ आणि साडी कपड्याचे वाटप करीत एक आदर्श पायंडा पाडला. यावेळी कर्जत नगरपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या भेटवस्तूने स्वच्छता कर्मचारी देखील भारावून गेले होते.
ढोकरीकर परिवाराच्यावतीने कर्जत नगरपंचायतच्या स्वच्छता कर्मचार्यांना दिवाळीनिम्मित राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांनी फराळ व साड्या-कपड्यांचे वाटप केले. बुधवारी आपल्या संपर्क कार्यालयात कर्मचार्यांना बोलवत महिला कर्मचार्यांना साडी-चोळी आणि पुरुष कर्मचार्यांना ड्रेस यासह रोख रक्कम कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आली.
यावेळी बोलताना नगरसेवक प्रसाद ढोकरीकर म्हणाले की, कर्जत शहरातील स्वच्छतेसाठी या कर्मचार्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. कर्जत शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कर्जत नगरपंचायतीचे महिला-पुरुष स्वच्छता कर्मचारी मोठी मेहनत घेतात.
कचरायुक्त, किळसवाणा, घाणेरडा परिसर अवघ्या काही वेळात स्वच्छ करण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या कार्याने कर्जत शहराची वेगळी ओळख निर्माण झाली असून सन्मान म्हणून दिवाळी भेट देत असल्याचे ढोकरीकर यांनी म्हटले.
यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, गटनेते संतोष मेहेत्रे, उप गटनेते सतीश पाटील, नगरसेवक भास्कर भैलुमे, पाणीपुरवठा सभापती भाऊसाहेब तोरडमल, राजेंद्र पवार, युवक शहरचे प्रा. विशाल मेहेत्रे, सुनील शेलार, लालासाहेब शेळके, रवी सुपेकर, भूषण ढेरे, रोहित पवार यांचे स्वीय सहायक बाळासाहेब साळुंके, सोमनाथ गायकवाड, हुजेर काझी यांच्यासह मोठ्या संख्येने स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी केले.
सामाजिक कार्यात ढोकरीकर परिवार कायम अग्रेसर : आ. रोहित पवार यांनी स्वीकृत नगरसेवकपदी प्रसाद ढोकरीकर यांची नियुक्ती केली. गेली अनेक वर्षांपासून प्रसाद ढोकरीकर विविध सामाजिक कार्यात सहभाग घेत असतात. यासह त्यांनी कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाकरीता स्वताच्या मालकीची जमीन शासनास देणगी स्वरूपात दिली. यासह आपल्या स्वच्छतेच्या आणि वृक्षारोपणाच्या कार्याने जगभरात पोहचलेल्या सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमींचा नुकताच धाकोजी विद्यालयात सन्मानपत्र देत ढोकरीकर कुटुंबियांनी गौरव केला होता.
blJiMZmYzQtTe