संगमनेर । वीरभूमी - 09-Nov, 2023, 12:45 PM
सदृढ लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा सभापती डॉ. नीलमताई गोर्हे यांनी गौरव केला असून मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी तेरा वर्षाच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांसाठी सातत्याने मोठा पाठपुरावा केला असून पदवीधरांचे व शिक्षकांचे सोडवलेले प्रश्न हे त्यांचे मोठे उल्लेखनीय काम राहिले असल्याचे गौरवउद्गार त्यांनी काढले आहे.
मुंबई विधान भवनात विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित स्नेह मेळावा व परिसंवाद कार्यक्रमात मा. आ. डॉ. तांबे यांचा गौरव झाला. यावेळी सर्व पक्षांचे आजी-माजी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभापती डॉ. गोर्हे म्हणाल्या की, विधान परिषदेला मोठे ऐतिहासिक महत्त्व असून मागील शंभर वर्षात अनेकांनी या सभागृहात प्रतिनिधित्व केले आहे. विविध क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांना योग्य न्याय देण्याचे काम या सभागृहांनी केले असून सदृढ लोकशाहीमध्ये विधानपरिषदेचे महत्त्व मोठे आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तेरा वर्षे या सभागृहात उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करताना सातत्याने शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लावली आहे. शिक्षकांच्या विविध समस्या, प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी यासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला असून बेरोजगारांच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय दिला आहे. शिक्षण क्षेत्र, समाजकारण, आरोग्य व पदवीधरांच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे उल्लेखनीय राहिले असल्याचेही त्या म्हणाल्या.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संसदीय लोकशाहीमध्ये विधानपरिषद ही अत्यंत महत्त्वाची आहे. शासन, विधानसभा, विधान परिषद, पत्रकार, न्यायव्यवस्था, प्रशासन या सर्व लोकशाहीच्या सुरक्षिततेसाठी असून लोकप्रतिनिधी हे समाजाचे प्रतिनिधीत्व करत असतात. मात्र सर्वच घटकांनी लोकशाहीत यावे यासाठी विधानपरिषद ही महत्त्वाची असून सदृढ लोकशाहीमध्ये संविधानिक नैतिकता ही महत्त्वाची आहे.
लोकशाहीत जनतेतून चालणारे शासन असून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असतात. त्यामध्ये विधानसभेत कमी संधी असते मात्र विधान परिषदेत व्यापक चर्चा होतात. विधानसभेचे सदस्य ही मतदार संघापुरते न राहता राज्याचे प्रतिनिधी असतात. मात्र बदलत्या परिस्थितीमुळे ते मतदार संघाचे प्रश्न मांडतात. त्यामुळे शिक्षणासारखे महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. यावर सखोल चर्चा व्हावी म्हणून विधानपरिषद महत्त्वाची आहे.
संसदीय लोकशाहीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायम विरोधकांचा सन्मान केला आहे. सरकार बदलले तरी विधान परिषद तशीच राहत असून विधान परिषदेमुळे विरोधकांनाही आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळते. तेरा वर्षे या विधानमंडळात प्रतिनिधित्व करताना शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, रस्ते अपघात, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करून घेता आले असल्याचे समाधानही त्यांनी व्यक्त केले.
vuxYlFeBJ