शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल । पिंगेवाडी येथून चोरीला गेली वाळू
शेवगाव । वीरभूमी - 25-Nov, 2023, 06:24 PM
शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी येथे महसूल प्रशासनाने पंचनामा करुन जप्त केलेल्या 40 ब्रास वाळू साठ्यातून 15 हजार रुपये किंमतीची 25 ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी कॉन्ट्रक्टर उदय भाउसाहेब मुंढे व भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण भाऊसाहेब मुंढे यांच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पिंगेवाडीच्या सरपंच रंजना तानवडे यांनी दिलेल्या जबाब व सादर केलेल्या फोटोवरुन मुंगीचे प्रभारी मंडल अधिकारी अय्या अण्णा फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दाखल केला आहे.
याबाबत दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 5 जुन 2023 रोजी पिंगेवाडी येथील प्राथमिक शाळा येथे 30 ब्रास व गट नंबर 99 मध्ये 10 ब्रास वाळु साठा मुंगीचे तत्कालिन मंडळ अधिकारी एस. पी. गौडा यांनी जप्त करुन पिंगेवाडीच्या सरपंच रंजना तानवडे यांच्या ताब्यात दिला होता. हा वाळू साठा ग्रामपंचायतीच्या अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाकरीता वापरण्यात येणार होता. यापैकी दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी प्राथमिक शाळा येथून 15 ब्रास वाळू आणि गट नं. 99 मधून 10 ब्रास वाळू असा 25 ब्रास वाळू साठा चोरीला गेला.
याबाबत महसूल प्रशासनाने चोरीचा गुन्हा दाखल न केल्याने पिंगेवाडीच्या सरपंच रंजना अशोक तानवडे यांनी औरंगाबाद खंडपिठात रिट पिटीशन दाखल केले होते. यावरुन तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी जा.क्र. कावि/जमा/527/2023 जमाबंदी संकलन दि. 16/11/23 अन्वये प्रभारी मंडल अधिकारी अय्या फुलमाळी चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाने सरपंच रंजना तानवडे यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, दि. 23 ते 24 ऑगस्ट 2023 रोजीच्या दरम्यान सदरचा वाळू साठा कॉन्ट्रक्टर उदय भाऊसाहेब मुंढे व अरुण भाऊसाहेब मुंढे यांनी त्यांचेकडील वाहन क्र. एमएच 16, सीडी 3470 व एमएच 16, सीडी 3670 व एमएच 16 सीसी 2670 व एमएच 16, सीसी. 5570 तसेच मुंढे कॉन्ट्रक्टर असे नाव काचेवर असलेला विना नंबरचा जेसीबीच्या साह्याने वाळू चोरुन नेली असल्याचा जबाब दिला व फोटो सादर केले.
यावरुन प्रभारी मंडल अधिकारी आय्या फुलमाळी यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात काँन्ट्रक्टर उदय भाऊसाहेब मुंढे व भाजपाचे प्रदेश चिटणीस अरुण भाऊसाहेब मुंढे यांनी त्यांचेकडील वाहनातून 15 हजार रुपये किंमतीची 25 ब्रास वाळू चोरुन नेली असल्याबाबत सखोल चौकशी होवून दोषीवर कारवाई करण्याबाबत फिर्यादीत म्हटले आहे.
Comments