काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावा
आ. लहू कानडे । अकोले येथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा
अकोले । वीरभूमी - 04-Dec, 2023, 01:57 PM
संविधानाचे बोट धरून, जनहिताचे व लोक कल्याणकारी राज्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळातील सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांना करावे लागेल, असे प्रतिपादन श्रीरामपूरचे आ. लहू कानडे यांनी केले.
अकोले तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सोन्याबापू वाकचौरे होते.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकरराव नवले, मीनानाथ पांडे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते, नानासाहेब रेवाळे,सतीश भांगरे, तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, रमेशराव जगताप, दादापाटील वाकचौरे, काँग्रेस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले, संपत कानवडे, आरिफभाई तांबोळी, रामदास धुमाळ, अमोल नाईकवाडी, ज्ञानेश्वर झडे, मीनाक्षी शेंगाळ, मंदाबाई नवले, अॅड. भाऊसाहेब नवले, मनोज गायकवाड, नवनाथ वाळुंज, मुरलीधर शेणकर, फैयाज माणियार, अफरोज सय्यद, अशोक माळी, अनिल वैद्य, रघुनाथ शेणकर, तन्मय भांगरे, बाळासाहेब भांगरे, लहानू खरात, शकील शेख, अॅड. सरोजिनी नेहे, सुनिता कानवडे आदिसह तालुक्यातील सर्व विभागातील कार्यकर्ते, बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. लहू कानडे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या 70 वर्षाच्या काळात सुई पासून अनुशास्त्रापर्यंत उभारणी केली आहे. विज्ञाननिष्ठ प्रगती केली. आता मात्र भाजप उलटा प्रवास करीत आहे. काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कायदे मंत्री बनवून, संविधान समितीचे अध्यक्ष करून सर्व जाती धर्माच्या लोकांचा विचार करून संविधान बनविले. त्यामुळेच काँग्रेस पक्षाला दीर्घाकाळ सत्ता मिळाली.
आज मिडीयाचा प्रभावी वापर होत असून आपल्यालाही युवकांना सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी शिकवावे लागणार आहे. आपल्याला सर्वांना समाजात जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून संवाद साधावा लागेल, त्यांना प्रेम द्यावे लागेल. त्यांना पक्षात काम करण्यास संधी द्यावी लागेल. महिला वर्गाला सन्मान द्यावा लागेल. त्यांचे मेळावे घेऊन त्यांना काँग्रेस पक्षात काम करण्याची संधी द्यावी लागेल. काँग्रेस पक्षाचे जुनी पिढीचा विचार युवकांना समजावून सांगावा लागेल, त्यांच्या कामाची, लेखणाची ओळख सांगावी लागणार आहे.
तेलंगणात काँग्रेस पक्ष विजयी होत असताना दुसरीकडे काँग्रेसच काँग्रेसचा पराभव करताना दिसत आहे. आज अनेक राज्यात भाजप सरकारमुळे नागरिकांना असुरक्षित वाटत आहे. त्यांना आधार देण्याचे काम करावे लागणार आहे. राज्यात आपण कोठे कमी पडलो आहे. याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. काँग्रेस संघटन हे कोणा एकाच्या मर्जी प्रमाणे चालवून जमणार नाही. त्यासाठी सर्वांना काम करण्याची संधी द्यावी लागणार आहे. भाजपने सर्व मिडीयाचे मालक विकत घेऊन मूळ प्रश्न जनतेपुढे येऊ देत नाही. त्यांना जे हवे ते मीडिया मार्फत समाजापुढे आणले जात आहे. हे लोकशाहीला अतिशय घातक आहे. भाजप सरकारचा शासन आपल्या दारी हा फसवा कार्यक्रम आहे. भाजप तीर्थक्षेत्राला जास्त निधी देऊन समाजाला धार्मिकेता वाढविण्याचे काम चालू आहे. जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम चालू आहे. अशी टीका आ. लहू कानडे यांनी केली.
मधुकरराव नवले म्हणाले की, काँग्रेस विधी मंडळाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर जनसंपर्क यात्रा सुरु आहे. अकोलेमध्ये लोकसभा निवडणुकीत 32 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. अकोले नगरपंचायत निवडणुकीत दोन नंबरची मते मिळाली होती. त्यामुळे काँग्रेसचा विचार हा सर्व सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी संघटनात्मक कार्यात योगदान द्यावे असे सांगितले.
राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते यांनी शिवाजी नेहे हे तालुकाध्यक्ष झाल्यापासून अनेक कार्यक्रम घेत आहेत. त्यामुळे काँग्रेस सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होत आहे. राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी दरमहा एक दिवस बैठक आयोजित केली जाणार आहे, असे सांगितले. तसेच बूथ कमिटी प्रमुख यांना विश्वासात घेऊन संघटनात्मक काम करावे. पक्षाला नवीन माणसे कशी जोडली जातील याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोन्याबापू यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. त्यांच्या खोट्या प्रचाराचे मुद्दे खोडले पाहिजे असे सांगितले. ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी तालुक्यातील विविध प्रश्नावर काँग्रेस पक्षाने आंदोलने करणे गरजेचे आहे. फिल्ड वर्क वर कार्यकर्त्यांना कामे करावे लागणार आहे. एकात्मता टिकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टीने आरक्षण देताना स्वतंत्र आरक्षण द्यावे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. पाणी प्रश्नावर समाधानकारक उत्तर शोधावे लागतील असे स्पष्ट केले.
यावेळी ज्ञानेश्वर झडे यांनी बूथ कमिटीला जास्तीत जास्त अधिकार देऊन त्यांना गाव पातळीवर काम करण्याची संधी द्यावी लागणार आहे, असे स्पष्ट केले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी निवडीचे वाचन तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे यांनी केले. त्याचे उपस्थित कार्यकर्त्यानी टाळ्या वाजवून स्वागत केले. स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश पाचपुते यांनी केले तर फैजान तांबोळी यांनी आभार मानले.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे अजूनही काँग्रेसचे काम करीत आहेत. त्यांची काँग्रेस पक्षाला गरज आहे. काँग्रेस पक्षाने त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा काँग्रेस पक्षात सन्मानाने घ्यावे, असा ठराव राज्यमहिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रुपवते यांनी मांडला त्यास सोन्याबापू वाकचौरे यांनी अनुमोदन देऊन ठराव पास करण्यात आला.
FDVWkZJCyAQbm