अध्यक्ष बदलावरुन झाला राडा । जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल
पाथर्डी । वीरभूमी- 14-Dec, 2023, 01:05 PM
भटक्यांची पंढरी म्हणुन नावजलेल्या श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरुन राडा झाला. अध्यक्ष बदलावरुन बोलावण्यात आलेल्या बैठकीदरम्यान विश्वस्तांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाली. या हाणामारीमध्ये काही गावातील तरुणांनी सहभाग घेतल्याने विश्वस्तांसह तरुण जखमी झाले.
ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान घडली. घटनेनंतर जखमींना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरुन दोन गटात मागील काही दिवसापासून धूसफूस सुरु होती. यामुळे आज गुरुवार दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान देवस्थानच्या सभागृहात विश्वस्तांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत बहुमताने अध्यक्ष बदलाबाबत निर्णय घेण्यात येणार होता. अध्यक्ष बदलाची चर्चा सुरु असतांनाच तेथे दोन गटात राडा झाला. विश्वस्तांमध्ये बाचाबाची सुरु असतांनाच काही स्थानिक तरुणांनी त्यामध्ये सहभाग घेतल्याने सुरुवातीला सुरु असलेली बाचाबाची लाठ्या-काठ्यांना हाणामारीपर्यंत आली.
दोन गटात अचानक सुरु झालेल्या हाणामारीने तेथे उपस्थितांमध्ये एकच धांदल उडाली. दोन्ही गटाने एकमेकांना हाणमार केल्याने यामध्ये काहीजन जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना पाथर्डी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी पाथर्डी ग्रामीण रुग्णालय व पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. जखमींवर उपचार सुरु असून पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Comments