शेवगाव शहरातील घटना । बँकेतून काढलेली 10 लाखांची रक्कम लंपास
शेवगाव । वीरभूमी - 29-Dec, 2023, 10:01 AM
बँकेतून काढलेली 10 लाख रुपयांची रक्कम दुचाकीवरुन घेवून जाणार्या एकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून व शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटनेने शेवगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी भरदुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास खुंटेफळ रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रासमोर घडली आहे. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत शेवगाव पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता. मात्र या घटनेने पुन्हा एकदा पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले असून ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, खुंटेफळ रोडलगत असलेल्या तिरुपती कॉटन इंडस्ट्रीजमधील मॅनेजर विठ्ठल लक्ष्मण सोनवणे (वय 46, रा. शेवगाव) यांनी गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान पाथर्डी रोडवर असलेल्या बडोदा बँकेतून जिनिंगसाठी लागणारी 10 लाख रुपयांची रोख रक्कम काढली. ती रक्कम घेवून ते खुंटेफळ रस्त्याने जिनिंगकडे दुचाकीवरुन जात असतांना जलशुद्धीकरण केंद्राजवळ आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी सोनवणे यांना अडवून थांबवले.
सोनवणे यांनी दुचाकी थांबवली असता त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून दुचाकी ढकलून दिली. तर एकाने तलवारीचा धाक दाखवून त्यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून दोघे चोरटे विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन शेवगावच्या दिशेने पसार झाले. यावेळी चोरट्यासोबत झालेल्या झटापटीमध्ये सोनवणे यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
विठ्ठल सोनवणे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात येवून घडलेली हकिगत सांगितली. यानंतर पोलिसांनी बँकेतील व खुंटेफळ रोड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान खुंटेफळ रस्त्यावरील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण काळ्या रंगाच्या विनाक्रमांकाच्या दुचाकीवरुन बँग घेवून जात असल्याचे आढळून आले. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नव्हता.
भरदुपारी घडलेल्या या रस्ता लुटीच्या घटनेने शेवगाव पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. विठ्ठल सोनवणे यांनी बँकेतून रक्कम काढल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवून लुटीची घटना घडल्याचा संशय आहे. शस्त्राचा धाक दाखवून रस्ता लुटीची घटना घडल्याने शेवगाव शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे स्पष्ट होत आहे.
OtsRbcAEM