पाथर्डी । वीरभूमी - 02-Jan, 2024, 06:17 PM
शहरात अज्ञात आजाराने डुकरे मरून नागरिकांच्या जिवाला धोका झाला आहे, पथदिवे बंद आहेत, आरोग्याचा ठेकेदार तुमचे ऐकत नाही असे तुम्ही म्हणता, अधिकारी कार्यालयात सापडत नाहीत, अंतर्गत रस्त्याचे काम बंद पडल्याने बाजारपेठ ठप्प झाली. ठेकेदारांमध्ये टक्केवारीवरून भांडणे होऊन गुंडांकडून धमकवून काम बंद पाडले जाते.
काम कधी सुरू होणार विचारण्यासाठी पालिका कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना सात वेळा फोन लावले. त्यांनी फोन घेतले नाहीत, लोकप्रश्नांची सोडवून कोण व कधी करणार असा सवाल करत संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस, शिवसेना व आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची पहिल्या मजल्यावरून खाली फेकत त्यांच्या दालनातील खुर्च्यांची मोडतोड केली. या प्रकाराने पालिका अंतर्गत राजकारण पेटले असून सर्वच कामांबाबत जाब विचारणार असल्याचे आंदोलनाचे नेते ऍड. प्रताप ढाकणे यांनी सांगितले.
शहरातील नवी पेठेतील काम बंद पडलेल्या रस्त्याची पाहणी करत ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, शहराध्यक्ष योगेश रासने, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाशिर शेख, आघाडीचे देवा पवार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोर्चा घेऊन पालिका कार्यालयात गेले.
तेथे कार्यालय अधीक्षक अमोल मदने, पालिका अभियंता विशाल मडवाई व अन्य कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली. एकही कर्मचारी जबाबदारीने न बोलता वेळ मारून नेत बोलत आहे असे लक्षात आल्यावर व त्यापूर्वी ढाकणे यांनी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना सात वेळा फोन केला. त्यांना विचारून सांगा, अशी मागणी करूनही त्यांनी संवाद घडवून आणला नाही. मात्र पुन्हा कॉल केल्यावर मुख्याधिकारी इतर कोणाशी बोलत होते त्यामुळे फोन एंगेज लागला. आपला फोन टाळला जातोय असे लक्षात येतात ढाकणे व त्यांचे समर्थक संतप्त होऊन घोषणाबाजी करू लागले.
मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची गॅलरीमध्ये खेचून आणत कार्यकर्त्यांनी खुर्ची खाली फेकून निषेध नोंदवला. कार्यकर्ते पुन्हा दालनात येत अन्य खुर्च्याची मोडतोड केली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत काम सुरू न केल्यास पुन्हा वेगळा पवित्रा घेण्याचा इशारा दिला. सायंकाळी पाच पूर्वी काम सुरू करतो असे बांधकाम अभियंता मडवाई यांनी सांगितले. ढाकणे म्हणाले, आगामी काळात सर्वच गैरप्रकारांची अशीच पोलखोल केली जाईल.
जनता आता गैरप्रकार सहन करणार नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे धाडस नेत्यांनी दाखवावे. तुमचे हात बरबटल्याने तुम्ही काही करत नाहीत, म्हणून जनता रस्त्यावर येते. दरम्यान सगळा राडा समजल्यावर मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी ढाकणे यांना स्वतः कॉल केला. उद्या सकाळी दहा वाजता कोणत्याही परिस्थितीत काम करतो असे आश्वासन ढाकणे यांनी मान्य केले. लवकरच तहसील कार्यालयाच्या अनागोंदी संदर्भात अशाच प्रकारच्या आंदोलन करू असे आंदोलकांनी जाहीर केले.
FJAXhpUzoxuDiQVk