पाथर्डी । वीरभूमी- 03-Feb, 2024, 04:33 PM
तालुक्यातील तिसगाव येथील बसस्थानक, वृद्धेश्वर चौक, शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची होत असलेली छेडछाड रोखुन संबंधित टवाळखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी व याठिकाणी कायमस्वरूपी महीला पोलिसांचे दामिनी पथक नियुक्त करावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने संतोष गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे करण्यात आली.
याबाबतचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे रामेश्वर भुकन, मुकुंद गारुडकर, भूषण पवार, सुनील लवांडे अखिल लवांडे, गणेश चोथे प्रवीण आव्हाड प्रसाद देशमुख विराज लवांडे, चैतन्य शेकडे, समर्थ मांजरे, संतोष बोरुडे, दिग्विजय देशमुख, विशाल माळवे, संदीप लवांडे, ओम शिंदे, रावसाहेब कोलते, किरण वाघ, अक्षय मरकड, सचिन जाधव, भास्कर लवांडे, रवी गायकवाड, महेश जेधे, संजय स्वामी, नामदेव जायभाये, दीपक महाराज काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रामेश्वर भुकन म्हणाले की, तिसगाव येथे शाळा महाविद्यालयात पंचक्रोशीतील अनेक जाती जमातीच्या हिंदू गोरगरीब विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही काळापासून येथील टवाळखोर मुले विद्यालयात जाताना व येताना या अल्पवयीन विद्यार्थिणींसोबत सतत गैरवर्तन करतात. चौकामध्ये उभे राहून मुलींची छेड काढणे, पाठलाग करणे, त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करणे इ. प्रकार कायम होत आहेत. अगदी वर्गात घुसून विद्यार्थिनींची छेड काढण्यापर्यंत या टारगट मुलांची मजल गेली आहे. यामुळे मुली व पालकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिणामी कित्येक मुलींचे शिक्षण थांबले आहे.
तरी संबंधित टारगट मुले व आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. शाळा महाविद्यालय परिसर, बसस्थानक परिसर येथे तात्काळ दामिनी पथकाची नियुक्ती करावी. विद्यार्थिनी शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून तक्रार करण्यास घाबरतात, त्यांना गुप्तपणे तक्रार करता यावी यासाठी महाविद्यालयात तक्रारपेटी उपलब्ध करून देण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी नायब तहसीलदार श्री. बागुल यांनी निवेदन स्वीकारले व तातडीने पोलीस निरीक्षकांशी बोलुन या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त दिला जाईल व संबंधित समाजकंटकावर कारवाई करू तसेच वरिष्ठांशीही याबाबत पत्र व्यवहार करू असे आश्वासन दिले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक यांना ही पाठवण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
Comments