लोकसभा निवडणूक शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढवण्याचा निर्धार
अहमदनगर । वीरभूमी- 29-Mar, 2024, 08:03 PM
मागील काही दिवसापासून नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक असलेले आमदार निलेश लंके यांनी आज आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर करत शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर लढण्याचे जाहीर केले.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी डॉ. सुजय विखे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच नगर दक्षिण लोकसभेसाठी इच्छुक असलेले आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांची पुणे येथे भेट घेतली होती.
भेटीनंतरही निलेश लंके शरद पवार गटात जाणार की नाही, याबाबत उत्सुकता लागून राहिली होती. मध्यंतरी निलेश लंके यांच्या ऐवजी राणीताई लंके या लोकसभेच्या निवडणुकीत उतरतील अशी चर्चाही होती. मात्र आज सुपा येथील बैठकीत आमदार निलेश लंके यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत लोकसभेच्या मैदानात उतरत असल्याचे जाहीर केले.
तसेच शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
jykDYRuKIAvPxMaS