अर्ज दाखल प्रक्रिया सुरु । दोन्ही मतदार संघातील प्रशासन सज्ज
नगर । वीरभूमी - 18-Apr, 2024, 04:02 PM
नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा निवडणुकीचा आजपासून धुराळा उडणार आहे. आज गुरुवारी निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. नगर दक्षिणमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असून शिर्डी मतदार संघात ऐनवेळी उत्कर्षा रुपवते यांनी बंडखोरी करत बसपाकडून उमेदवारी मिळवत तिरंगी लढत केली आहे.
देशभरात दि. 16 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून तब्बल एक महिन्यानंतर अहमदनगर दक्षिण व शिर्डी लोकसभेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक अधिसुचना जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे. मात्र देशात निवडणुका जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांकडून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचारात चुरस दिसणार आहे.
नगर दक्षिणमधून महायुतीचे उमेदवार म्हणुन विद्यमान खा. सुजय विखे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पारनेरचे आ. निलेश लंके यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करत आपल्या पदाचा राजीनामा देत लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. खरा सामना महायुती व महाविकास आघाडीत मानला जात असतांना ओबीसी बहुजन पक्षाकडून दिलीप खेडकर यांनी उमेदवारी मिळवत तिरंगी लढत करण्यात कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
तर शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून विद्यमान खा. सदाशिव लोखंडे तर महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली. येथे काँग्रेसला मतदार संघ मिळाला नसल्याने नाराज झालेल्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश करुन उमेदवारी मिळवली आहे. यामुळे शिर्डीत तिरंगी लढत होणार आहे.
नगर दक्षिणसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून तर शिर्डीसाठी राहाता येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणुकीचे कामकाज पाहिले जाणार आहे. आज गुरुवार दि. 18 रोजी अधिसुचना जाहीर झाल्यानंतर दि. 25 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दि. 26 रोजी दाखल अर्जाची छाननी होणार असून दि. 29 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. तर दि. 13 मे रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
उमेदवारांना निवडणूक खर्च गुरुवारपासून दररोज सादर करावा लागणार आहे. हा खर्च निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या दरानुसारच सादर करावा लागणार आहे.
निवडणूक कार्यक्रम : अर्ज स्वकृती : 18 एप्रिल
अर्ज दाखल शेवटचा दि. 25 एप्रिल
अर्जाची छाननी 26 एप्रिल
माघारीचा अखेरचा दिवस 29 एप्रिल
मतदान ः 13 मे
मतमोजणी : 4 जून
36 लाख 35 मतदार
लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघात 3 हजार 734 मतदान केंद्र राहणार असून 36 लाख 35 हजार 366 मतदार आहे. त्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघात 1708 मतदान केंद्र तर 16 लाख 67 हजार 517 मतदार आहेत. अहमदनगर 2023 मतदान केंद्र तर 19 लाख 67 हजार 849 मतदार आहेत.
fmlRZNpxFX