लंकेंच्या बॅनरवर स्व. गोपीनाथ मुंडे, स्व. राजीव राजळे यांचे फोटो । विष्णुपंत अकोलकर यांची कारवाईची मागणी
पाथर्डी । वीरभूमी- 27-Apr, 2024, 11:47 PM
मविआचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे होणार्या सभेच्या बॅनरवर मविआच्या नेत्यांसह स्व. राजीव आप्पासाहेब राजळे यांचा फोटो छापण्यात आला असून यावर भाजपाचे विष्णुपंत अकोलकर यांनी हरकत घेतली आहे. याबाबत अकोलकर यांनी सहाय्यक निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत आपल्या हरकतीमध्ये विष्णुपंत अकोलकर यांनी म्हटले आहे की, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मविआचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ होणार्या सभेसाठी सोशल मीडियावर प्रसारीत होणार्या जाहीरातीत स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. गोपीनाथराव मुंढे, स्व. बबनराव ढाकणे, स्व. मारुतराव घुले, स्व. आबासाहेब काकडे, स्व. डॉ. टी. के. पुरनाळे व स्व. राजीव राजळे यांचे फोटो छापलेले आहेत. तर निमंत्रक म्हणुन महाविकास आघाडी पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघ असे लिहिलेले आहे.
लंके यांच्या या जाहीरात बॅनरवर स्व. राजीव राजळे यांचा फोटो छापण्यात आलेला आहे. स्व. राजीव राजळे यांच्या पत्नी मोनिका राजीव राजळे या भाजपाच्या विद्यमान आमदार असून त्या भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. तरी विरोधी पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे भाजपा आमदार मोनिका राजळे यांचे पती स्व. राजीव राजळे यांचा फोटो जाहीरात बॅनरवर छापून मतदारांच्या व जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करीत आहेत.
तसेच बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे वडील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचाही फोटो निलेश लंके यांच्या जाहीरात बॅनरवर छापण्यात आलेला आहे. तरी भाजपाच्या विद्यमान आमदार व विद्यमान उमेदवार यांचे कुटुंबातील दिवंगत नेत्यांचे फोटो विरोधकांनी कोणतीही परवानगी न घेता छापणे हे गैर असून ही मतदार व जनतेची फसवणूक करुन संभ्रम निर्माण करत असंतोष पसरविण्याची कृती आहे.
तरी निवडणुकीतील असे गैरप्रकाराला निवडणूक आयोगाने व आचार संहिता कक्षाने मज्जाव करणे गरजेचे आहे. तरी महाविकास आघाडीचे सोशल मीडियावरील सदरी जाहीर प्रचाराची इमेज तात्काळ काढावी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांचे कोणत्याही प्रचार साहित्य, बोर्ड, जाहीरात व सभेतील बॅनर यावर असे फोटो वापरण्यास मज्जाव करुन आचारसंहिता नियमानुसार निमंत्रक, निवडणूक प्रतिनिधी व उमेदवार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती भाजपाचे विष्णुपंत अकोलकर यांनी केली आहे.
Comments