पाथर्डी । वीरभूमी - 24-May, 2024, 10:54 AM
तालुक्यातील चिंचपुर पांगुळ येथील पोपट दशरथ बडे यांच्या 11 मार्च 2024 रोजी चोरीला गेलेल्या दोन म्हशी पोलिसांनी नांदगाव (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथुन ताब्यात घेतल्या आहेत. चोरीच्या म्हशी वाहतुक करणारा विजय लक्ष्मण खेडकर (रा. भालगाव, ता. पाथर्डी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर भारत फुलमाळी व बाबासाहेब विनायक भवार यांच्यासह दोघेजण अनोळखी फरार आहेत. म्हशी चोरणार्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिस हवालदार सोमीनाथ बांगर यांच्याकडे म्हशी चोरी प्रकरणाचा तपास होता.
पोपट बडे यांच्या फिर्यादी वरुन पाथर्डी पोलिस ठाण्यात दोन म्हशी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. दुसर्या चोरी प्रकरणात अटक असलेले आजीनाथ पवार, गणेश पवार, विनोद बर्डे, अविनाश मेहत्रे, अमोल मंजुळे यांच्याकडे तपास केला असता विनोद बर्डे याने म्हशी चोरी प्रकरणात भारत फुलमाळी व बाबासाहेब बर्डे यांनी वडगाव येथील म्हशी मुंबई येथे नेहुन विकल्या असल्याचे सांगितले. पुढील माहीती सांगण्यास नकार दिला.
भारत फुलमाळी (रा. वारणी, जि. बीड) हा दुसर्या चोरी प्रकरणात फरार आहे. पोलिस हवालदार सोमीनाथ बांगर यांनी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी तांबे यांच्याशी चर्चा करुन गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे म्हशी घेवुन जाणारे चालक विजय लक्ष्मण खेडकर (रा. भालगाव) याला ताब्यात घेतले.
फिर्यादी पोपट बडे, सोमीनाथ बांगर, किरण बडे, अशोक बडे हे विजय खेडकर याला घेवुन नांदगाव (ता. मुरबाड, जि. ठाणे) येथे गेले. तेथे पद्माकर धाऊ आलम यांच्या म्हशीच्या तबेल्यामध्ये जाऊन म्हशीचा शोध घेतला. पोपट बडे यांनी दोन म्हशी ओळखल्या. पोलिसांनी त्या म्हशी ताब्यात घेतल्या आहेत.
पद्माकर आलम यांनी सांगितले की, भारत फुलमाळी व बाबासाहेब भवार यांनी दोन म्हशी माझ्याकडे आणुन सोडल्या व आमच्याकडे चारा नाही. म्हणुन आमच्या म्हशी काही दिवस तुम्ही सांभाळा, पुन्हा घेवुन जाऊ असे सांगितले. भारत फुलमाळी हा म्हशीचा व्यापार करतो, त्यामुळे आमची ओळख असल्याचे आलम यांनी सांगितले.
पोलिसांनी विजय लक्ष्मण खेडकर याला अटक करुन पिकअप ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी भारत फुलमाळी, बाबासाहेब भवार व दोन अनोळखी इसम फरार आहेत. पोलिसांना भारत फुलमाळी व बाबासाहेब भवार दोघेजण अटक झाल्यानंतर आणखी काही चोरीचे गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तालुक्यातील या पशुधन चोरीचा तपास लावून शेतकर्याला त्याचे पशुधन परत केल्याने पोलिसांचे तालुक्यातील जनतेकडून अभिनंदन होत आहे.
माझ्या दोन म्हशी पोलिसांनी मुरबाड येथुन ताब्यात घेवुन मला दिल्या आहेत. मी पोलिसांना सारखी विनंती करीत होतो की, म्हशी चोरणारे अटक करावेत. पोलिसांनी चोरीचा तपास लावला. एक लाख 10 हजार रुपये किंमतीच्या दोन म्हशी मला मिळाल्या. शेतकर्यांचे पशुधन गेले तर त्याची अवस्था वाईट होते. पाथर्डी पोलिसांना धन्यवाद देतो. - पोपट बडे, फिर्यादी शेतकरी
Comments