शेवगाव । वीरभूमी - 24-May, 2024, 11:26 AM
तालुक्यातील माळेगाव-ने येथील शेतकर्यांच्या जनावरांना आठ दिवसाच्या आत दावणीला चारा व पाणी द्यावे. अन्यथा येथील शेतकर्यांचा शेवगाव तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्याचा इशारा जनशक्तीचे अॅड. शिवाजीराव काकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबतचे निवेदन काकडे यांच्या नेतृत्वात माळेगाव ने येथील शेतकर्यांनी शेवगावचे निवासी नायब तहसीलदार दिपक कारखिले यांना दिले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव तालुक्यातील पूर्व भाग हा शासनाने टंचाईग्रस्त म्हणून नुकताच जाहीर केला आहे. पूर्व भागातील माळेगाव ने येथील बहुसंख्य शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. तर काही थोडीफार शेती असल्याने दूध धंद्यावर अवलंबून आहेत. त्यांची उपजीविका ही दूध धंद्यावरच चालु असते. साधारतः येथे सुमारे 2000 हून अधिक पशुधन या परिसरात आहे. परंतु चारा व पाणी नसल्याने जनावरांचे कुपोषण, हाल होत आहेत. हे हाल आता पहावले जात नाहीत.
सध्या अतिउष्ण तापमानामुळे व चालू वर्षी झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. तर जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चार्याची सोय राहिलेली नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन जगवण्यासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेच्या समस्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
चालू वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे परिसरातील कूपनलिका व विहिरींनी तळ गाठला आहे. याशिवाय पूर्व भागात पाण्याचा दुसरा काही पर्याय नसल्याने शेतकर्यांच्या पशुधनाला पाणी पाजायचे कोठून. जनावरांना चारा आणायचा कोठून? असे प्रश्न आज शेतकर्यांसमोर निर्माण झालेले आहेत. तालुक्यात शेतकरी वाटेल त्या कवडीमोल भावाने जनावरे विकत आहेत. असेच चालू राहिले तर मेहनत, मशागत करण्यासाठी शेतकर्यांकडे पशुधन राहणारच नाही.
शासनाची मागेल त्याला चारा व पाणी देण्याची भूमिका आहे. त्यामुळे तालुक्यातील माळेगाव ने येथील शेतकर्यांच्या जनावरांना आठ दिवसाच्या आत दावणीला चारा व पाणी द्यावे. अन्यथा शेतकरी शेवगाव तहसील कार्यालयावर महामोर्चा काढतील, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदन देतेवेळी अॅड. शिवाजीराव काकडे यांच्यासह जनशक्तीचे महासचिव जगन्नाथ गावडे, पंढरीनाथ सुडके, बप्पासाहेब भिसे, ऋषिकेश भिसे, जालिंदर गावडे, मच्छिंद्र सुडके, गोरक्षनाथ भिसे, अशोक गाडेकर, कल्याण दसपुते आदी उपस्थित होते.
Comments