पाण्यासाठी पाथर्डी नगरपालिकेवर वाजत-गाजत मोर्चा
गैरहजर मुख्याधिकार्यांच्या खुर्चीवर रिकामा हंडा पालथा घातला । टेबलवर स्मशानभूमीतील फुटक्या मडक्याची खापरे ठेवून केला निषेध
पाथर्डी । वीरभूमी - 25-May, 2024, 01:13 AM
वेळेवर पाणी न देणार्या पालिकेचा धिक्कार असो, निष्क्रिय मुख्याधिकार्यांवर कारवाई करा, पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार्या अधिकारी लोकप्रतिनिधींचा निषेध असो, पिण्याला पाणी मिळालेच पाहिजे अशा स्वरूपाच्या आक्रमक घोषणा देत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पालिका कार्यालयावर वाजत-गाजत मोर्चा काढला. काही काळ उपस्थित कर्मचार्यांना घेराव घालून दालना बाहेर जाण्यास मज्जाव केला. मुख्याधिकारी पूर्व सूचना देऊनही गैरहजर राहिल्याने त्यांच्या खुर्चीवर रिकामा हंडा पालथा घालून व टेबलवर स्मशानभूमीतून आणलेल्या फुटक्या मडक्याची खापरे ठेवून निषेध नोंदविण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्व माजी प्रदुषण आयुक्त व ओबीसी नेते दिलीपराव खेडकर, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, अॅड. दिनकर पालवे यांनी केले. आंदोलक प्रमुख चौकातून वाजत गाजत घोषणा देत आले. मोर्चा सुरू झाला त्यावेळी तीव्र उन्हामुळे बोटावर मोजणे एवढे कार्यकर्ते उपस्थित होते. पालिका कार्यालयात मात्र कार्यकर्ते जमा झाले. पाणीपुरवठा विभागाचे सचिन राजभोज, नगर अभियंता विशाल मडवई, पालिका कर्मचारी शंकर हाडके यांनी आंदोलकांशी चर्चा करून पाणीपुरवठा बाबत माहिती दिली.
आक्रमक आंदोलकांनी त्यांना रोखून धरत मुख्याधिकारी आल्याशिवाय हटत नाही. त्यांचे बोलणे करून देण्याची मागणी केली. कर्मचार्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करताच संतप्त आंदोलकांनी खुर्चीवर हंडा व टेबलवर स्मशानभूमीतून उचलून आणलेले मडक्याचे तुकडे ठेवत निषेधाच्या घोषणा दिल्या.
मुख्याधिकार्याच्या कामाची चौकशी होऊन कारवाई करा, पालिका कार्यालयात त्यांची उपस्थिती जाणवत नाही. पाण्याचे नियोजन टँकरची मागणी करण्याऐवजी मुख्याधिकारी नेमके काय काम करतात. याचा कर्मचार्यांना सुद्धा थांगपत्ता लागत नाही. शहराची पाणी परिस्थिती अतिशय बिकट होऊन नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जायकवाडी योजना कालबाह्य झाली असून ठेकेदाराची मुदत संपून अनेक वर्षे झाली. सर्वपक्षीय पुढारी झोपलेले असून गावाकडे कोणाचे लक्ष नाही. आम्ही राजकारणापासून दूर झालो म्हणजे गावापासून नाही. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास यापुढे होणारे आंदोलन उग्र असेल असा इशारा घोडके यांनी दिला.
यावेळी बोलताना अॅड. दिनकर पालवे म्हणाले, शहरात काही भागात दोन वेळेस तर काही भागात पंधरा दिवसातून एक वेळ पाणी मिळते, असमान पाणी वाटप त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊन लोकांच्या अडचणी कडे लक्ष नाही. मोठे पुढारी, आजी-माजी आमदाराचे लक्ष नाही. आम्हाला कोणत्याही निवडणूक लढवायच्या नाहीत. पाण्याची भीषण समस्या प्रशासन व लोकप्रतिनिधींना दिसत नाही हे खरे ग्रामस्थांचे दुःख आहे. हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकल्याशिवाय पुढार्यांना व अधिकार्यांना लोकांचे दुःख कळणार नाही. पुढचे आंदोलन अधिक तीव्र करू.
माजी आयुक्त दिलीप खेडकर म्हणाले, शहरासह तालुक्यात पाणी परिस्थिती अत्यंत भीषण असून मूलभूत प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. येथे सोमवारी शहरासह जायकवाडी योजनेच्या सद्यस्थिती सह तात्काळ पाणी मिळवण्यासाठी काय उपाययोजना हाती घेण्यात याव्यात यावर संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिकारी यांनी दिल्याने आजच्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
नागनाथ गर्जे व सुनिल पाखरे म्हणाले, निवडणुकीत मतासाठी फिरणारे लोकप्रतिनिधी आता गायब झाले आहेत. पैठण धरणात जॅकवेल मध्ये ज्ञानेश्वर कारखान्याच्या मळीचे पाणी येते. तिथूनच दूषित पाणी मिळते याकडे मात्र सर्वजण डोळेझाक करतात. कुबट वासाचे, दुर्गंधीयुक्त, फेस येणारे दुषीत पाणी पिऊन योजनेवरील गावांमध्ये माणसे सतत आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुख्याधिकार्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी. नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या कारखान्यांविरुद्ध कारवाई व्हावी.
यावेळी झालेल्या चर्चेत सुनील पाखरे, सुरेश हुलजुते, किसन आव्हाड, जनता दलाचे भगवान बांगर, शिवसेनेचे सचिन नागापुरे, दिलीप आंधळे, पप्पू बनसोड, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब ढाकणे, श्रीधर हंडाळ, गोरख ढाकणे, मनोज गांधी, सुरेश डोमकावळे आदींनी भाग घेत पालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून कडक शब्दात टीका केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर व त्यांचे सहकार्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
Comments