ठेकेदाराकडून बँक गंरंटीसह अनुभव प्रमाणपत्रही बनावट दिल्याचे उघड । ठेकेदार व पालिकेच्या गोंधळात नागरिकांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ
शेवगाव । वीरभूमी - 28-May, 2024, 08:17 PM
शेवगाव शहरासाठी मंजूर असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतांना योजनेच्या ठेकेदाराने टेंडर भरतांना खोटी माहिती देवून फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी नगरपरिषदेचे लेखापाल सुग्रीव पांडुरंग फुंदे यांच्या फिर्यादीवरुन छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रायणी कन्ट्रक्शनचे सुनिल मधुकर नागरगोजे यांच्याविरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शेवगावच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शेवगाव पाणीपुरवठा योजनेच्या कामांवरुन राजकीय आरोप केले जात होते. पाणीपुरवठा योजनेच्या कामासह इतर मागण्यांसाठी गुरुवार दि. 30 रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर मुक्का ठोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर आंदोलनाच्या दोन दिवस अगोदरच नगरपरिषदेने पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ठेकेदार व पालिकेच्या गोंधळात नागरिकांवर पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे.
याबाबत नगरपरिषदेचे लेखापाल सुग्रीव फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेवगाव शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत पाणीपुरवठा योजनेची टेंडर प्रक्रिया दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी होवून छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रायणी कन्ट्रक्शनने निविदा भरतेवेळी सादर केलेले अनुभवाचे कागदपत्र शेवगाव नगरपरिषदेकडे जमा केले होते. सदर कागदपत्राची तपासणी करुन ते पात्र ठरल्यानंतर आर्थिक तक्ता ओपन करुन प्राप्त निविदापैकी सर्वात कमी दराने असल्याने इंद्रायणी कन्ट्रक्शनला 12 मे 2023 रोजी निविदा स्वीकृतीचे पत्र देण्यात आले. त्यानुसार इंद्रायणी कन्ट्रक्शनने एक कोटी 56 लाख 60 हजार रुपयाची मुदत ठेव पावती नगरपरिषदेकडे जमा केली होती. यावरुन इंद्रायणी कन्ट्रक्शनला दि. 7 जून 2023 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला.
यानंतर इंद्रायणी कन्ट्रक्शनचे सुनिल मधुकर नागरगोजे यांनी बँक हमीपत्र सादर केल्यानंतर मुदत ठेव पावती परत करण्यात आली. त्यानंतर ई-मेलने बँक गँरंटीची पडताळणी केल्यानंतर ती खरी असल्याचा मेलही प्राप्त झाला. मात्र बँक गॅरंटीची रक्कम जास्त असल्याने नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अभियंता सचिन राजभोज यांना प्राधिकृत करुन प्रत्यक्ष पडताळणी केली. मात्र यावेळी धक्कादायक माहिती समोर आली.
सुनिल नागरगोजे यांनी जमा केलेली बँक गँरंटी ही बनावट असल्याचे समोर आले. तसेच बीड जिल्ह्यातील किल्लेधारु नगरपरिषदेकडे कामाचा अनुभव प्रमाणपत्राची पडताळणी केली असता तेही बनावट असल्याचे दि. 13 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार समोर आले. अनुभव प्रमाणपत्रही किल्लेधारु नगरपरिषदेच्या संचितेमध्ये आढळून आलेले नाही. तसेच सदरील प्रमाणपत्राची जावक वहीमध्ये नोंद नसल्याचे समोर आले.
यासर्व प्रकारावरुन शेवगाव नगरपरिषदेची खात्री झाली की, सुनिल नागरगोजे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रायणी कन्ट्रक्शनने दिलेली बँक गँरंटी व अनुभव प्रमाणपत्राचे बनावट कागदपत्र बनवून त्याचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याने स्पष्ट झाले.
याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात छत्रपती संभाजीनगर येथील इंद्रायणी कन्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सुनिल नागरगोजे यांच्याविरोधात खोटी कागदपत्र सादर करुन फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे राजकारण्यासह शेवगावकरांमध्ये एकच खळबळ उडाली असून कन्ट्रक्शनच्या फवणुकीमुळे शेवगावकरांना आणखी काही दिवस तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याने तीव्र चीड निर्माण झाली आहे.
LhtyzxrGJUD