शेवगाव पोलिसांची कामगिरी । एक लाख रुपये किंमतीचे 8 मोबाईल संच मुळ मालकांना केले परत
शेवगाव । वीरभूमी - 11-Sep, 2024, 12:44 PM
शेवगाव तालुक्यातील आठवडे बाजार, बसस्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहून गहाळ झालेले 1 लाख रुपये किंमतीचे आठ मोबाईल संच संबंधीत मुळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हे मोबाईल संच कोणाकडून हस्तगत करण्यात आले हे मात्र स्पष्ट होत नाही. मात्र पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिली.
शेवगाव शहरामध्ये आठवडे बाजार, बसस्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीस गेलेल्या मोबाईलचा गैरवापर होवू नये, संबंधीत मोबाईल नंबर पुन्हा मिळावा यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात जावून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी देतात. या तक्रारीवरुन शेवगाव पोलीसांनी शोध मोहीम राबवली. त्यामध्ये गहाळ झालेल्या मोबाईल पैकी 8 मोबाईल संच पोलीसांनी शोधून काढले. मात्र हे मोबाईल कोणाकडून हस्तगत केले हे मात्र स्पष्ट झाले नाही.
हस्तगत केलेले 1 लाख रुपये किंमतीचे आठ मोबाईल संच मंगळवार दि. 10 रोजी पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांनी संबंधीत मुळ मालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या प्रेसनोट मध्ये ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोहेकाँ. परशुराम नाकाडे, पोकॉ. शाम गुंजाळ, संतोष वाघ, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर, बप्पासाहेब धाकतोडे, प्रशांत आंधळे, संपत खेडकर यांनी केल्याचे म्हटले आहे.
मात्र हे मोबाईल संच कोणाकडून हस्तगत केले याबाबत पोलिसांना सांगता आले नाही. यामुळे गहाळ झालेले मोबाईल संच कोणाकडून मिळाले याचे कोडे उलगडले नाही.
आरोपी नसलेली कामगिरी
पोलिसांना मिळालेले मोबाईल संच हे मुळ मालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. मात्र हे मोबाईल पोलिसांना कसे मिळाले हे पोलिस सांगू शकले नाहीत. अनेकवेळा आरोपी पकडल्यानंतर त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला जातो. यातून अनेक गुन्हे उघड होतात. मोबाईल संच गहाळ झाल्यानंतर त्याच क्रमांकाचे सिमकार्ड मिळण्यासाठी अनेकजन पोलिस ठाण्यात येवून तक्रार देतात. या तक्रारीच्या आधारे मालकांचा शोध घेवून ते परत करण्यात आले.
Comments