आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे
प्रांताधिकारी प्रसाद मते । शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकार परिषदेत माहिती
शेवगाव । वीरभूमी - 16-Oct, 2024, 09:40 AM
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत असून आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल आहे. निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शांततेत व सुरळीतपणे मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दुपारी 3.30 वाजेपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत सांगडे, तहसीलदार उद्धव नाईक, तालुका कृषी अधिकारी श्री. टकले उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते म्हणाले, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघामध्ये एकुण दोन तालुके व त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील 8 मंडळ व 113 महसुली गावे तसेच पाथर्डी तालुक्यातील 6 मंडळ व 101 महसुली गावांचा समावेश आहे. मतदारसंघात 3 लाख 72 हजार 476 मतदार असून यापैकी पुरुक मतदार 1 लाख 93 हजार 876, स्त्री मतदार 1 लाख 78 हजार 594 मतदार तर तृतीयपंथी मतदार 6 यांचा समावेश आहे. यापैकी युवक मतदार 8 हजार 138, दिव्यांग मतदार 2 हजार 464, गृहभेटी मतदार 85 पेक्षा जास्त, 102 सेवादलांमध्ये कार्यरत मतदार यांचा समावेश आहे.
मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी 365 मतदान केंद्र होती. परंतू एका मतदान केंद्रामध्ये 1500 मतदारांचा निष्कर्ष ठेवता विधानसभेसाठी नव्याने 3 मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे सद्यस्थितीत 368 मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत. यामध्ये शेवगाव शहरातील (क्र. 76 व 91) अशी दोन व पाथर्डी शहरातील (क्र. 246) या एका मतदान केंद्राचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी 35 (राखीव 4), मतदान अधिकारी 1708 (राखीव 236) यांची नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचार्यांचे निवडणूक विषयक प्रशिक्षण हे 26 ऑक्टोबर व 8 नोव्हेंबर रोजी शेवगाव येथील त्रिमुर्ती विद्यालयात होणार आहे.
आचारसंहिता पालन होणेचे दृष्टीने जिल्हा हद्द असलेल्या कर्हेटाकळी (ता. शेवगाव), मिडसांगवी व चितळवाडी (ता. पाथर्डी) अशा 3 ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके असणार आहेत. तसेच 6 भरारी पथके, 3 व्हिडीओ सर्व्हेक्षण पथकांसह बंदोबस्तासाठी 500 पेक्षा जास्त पोलिस कर्मचार्यांना नेमणुका देण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीची सर्व प्रक्रिया व मतमोजणी शेवगाव तहसील कार्यालयामध्ये होणार आहे. तरी सर्व उमेदवार व मतदार यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करुन निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे.
तक्रार निवारणासाठी सीव्हीजील अॅप : आचारसंहितेबाबत कोणाची काही तक्रार असल्यास ती सीव्हीजील अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून केलेली तक्रार थेट जिल्हापातळीवर जावून तेथून ती स्थानिक प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी येणार आहे. तक्रारीची दखल घेवून तीन तासाच्या आत कारवाई करण्यात येणार आहे.
उमेदवारांसाठी एक खिडकी योजना : शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना विविध परवानग्यासाठी तहसील कार्यालयात एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये वाहन परवाना, बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी परवानग्या एक खिडकी मार्फत देण्यात येणार आहेत. तसेच प्रचारसभा परवानगीसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज व प्रथम येणार्या अर्जावर नियमांनुसार कार्यवाही करण्यात येवून त्यानुसार परवानगी देण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी सांगितले.
Comments