शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढविण्याची तयारी
शेवगाव । वीरभूमी- 22-Oct, 2024, 10:39 PM
कोणत्याही परिस्थितीत शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी करण्याचा चंग बांधलेल्या माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे चंद्रशेखर घुले शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणूक जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली अपक्ष लढविणार असल्याचे बोलले जात आहे.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातून सर्वप्रथम वंचितकडून प्रा. किसन चव्हाण, भाजपाकडून आ. मोनिका राजळे यांच्या उमेदवारी जाहीर झाल्या आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे असल्यामुळे येथे अॅड. प्रताप ढाकणे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर अपक्ष म्हणुन माजी आ. चंद्रशेखर घुले, जनशक्तीच्या हर्षदा काकडे, गोकुळ दौंड निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.
वंचित व भाजपाने आपले उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा झडत होत्या. मात्र खा. निलेश लंके यांच्या आग्रहाने अॅड. प्रताप ढाकणे यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
त्यातच आज माजी आ. चंद्रशेखर घुले यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांची भेट घेत पाठिंबा मागितला आहे. यावेळी घुले यांच्याबरोबर संजय कोळगे हे उपस्थित होते.
मनोज जरांगे यांच्याशी झालेल्या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत समजू शकले नाही. मात्र माजी आ. चंद्रशेखर घुले हे मनोज जरांगे यांच्या पाठिंब्यावर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
शेवगाव -पाथर्डी मतदार संघातील इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे ही निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची होणार असल्याचे मानले जात आहे.
Comments