पहिल्याच दिवशी 18 जणांनी घेतले 46 अर्ज
शेवगाव । वीरभूमी - 22-Oct, 2024, 04:45 PM
शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर 18 जणांनी 46 अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली.
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी राजेंद्र रंगनाथ ढाकणे (अपक्ष), पांडुरंग गोरक्ष शिरसाट (अपक्ष), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष) या तीन इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. तर 18 इच्छुकांनी तब्बल 46 अर्ज नेले आहेत.
शेवगाव तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तेथे प्रशासनाच्यावतीने इच्छुकांच्या मदतीसाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी प्रसाद मते हे काम पहात असून त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणुन तहसीलदार प्रशांत सांगडे व तहसीलदार उद्धव नाईक हे काम पहात आहेत.
शेवगाव-पाथर्डी मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. किसन चव्हाण, भाजपाकडून मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर झाल्या आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहीले आहे. मात्र ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार हे नक्की.
Comments