नागवडे अजितदादांना धक्का देण्याच्या तर पाचपुते उमेदवारी बदलण्याच्या तयारीत
अहिल्यनगर । वीरभूमी - 20-Oct, 2024, 11:49 PM
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रतिभाताई पाचपुते यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटाकडून इच्छुक असलेल्या अनुराधान नागवडे व राजेंद्र नागवडे हे दांम्पत्य नाराज झाले असून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पक्षाला सोडचिठ्ठी देवून महाविकास आघाडीमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. तर आपल्या ऐवजी पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणीकरण्यासाठी आ. बबनराव पाचपुते व प्रतिभाताई पाचपुते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने सर्वप्रथम राज्यातील 99 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून शिर्डीसह श्रीगोंदा, राहुरी, कर्जत-जामखेड व शेवगाव मतदार संघातून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये श्रीगोंदाचे आ. बबनराव पाचपुते यांच्या प्रकृत्ती स्वास्थ्याचे कारणाने त्यांच्याऐवजी पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांचे नाव जाहीर केले.
श्रीगोंदा मतदारसंघातून प्रतिभा पाचपुते यांचे नाव जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत भावना जाणुन घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी कोणतेही चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली. यामुळे नागवडे दांम्पत्य महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाकडे श्रीगोंदा मतदारसंघ जातो याकडे इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यामुळे नागवडे दांम्पत्याने महाविकास आघाडीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. अगोदरच महाविकास आघाडीकडून माजी आ. राहुल जगताप, साजन पाचपुते, बाबासाहेब भोस, घनश्याम शेलार आदी नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
आ. बबनराव पाचपुते यांच्याऐवजी पत्नी प्रतिभाताई पाचपुते यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली. मात्र मला उमेदवारी नको मुलाला उमेदवारी द्या, या मागणीसाठी पाचपुते दांम्पत्य मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मुंबईत गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून उमेदवारी बदलण्याची मागणी करणार असल्याचे समजते.
या सर्व राजकीय घडामोडींना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात वेग आला असून महायुतीनंतर महाविकास आघाडीची उमेदवारी कोणत्या पक्षाला व कोणाला मिळते? याकडे लक्ष लागून राहीले आहे.
Comments