मनसेची सहावी यादी जाहीर । तिरंगी लढतीमुळे चुरस वाढणार
अहिल्यानगर । वीरभूमी - 27-Oct, 2024, 11:08 PM
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज 32 उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. या यादीमध्ये नगर शहरासह राहुरी, संगमनेर मधून राज ठाकरे यांनी तीन शिलेदारांना संधी दिली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढतीमध्ये मनसेमुळे चुरस निर्माण होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या सहाव्या यादीमध्ये एकुण 32 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नगर शहरातून सचिन डफळ, राहुरी मधून ज्ञानेश्वर गाडे (माऊली) आणि संगमनेरमधून योगेश सूर्यवंशी यांच्या नावाचा समावेश आहे. राज ठाकरेंच्या या तीन शिलेदारांची नावे जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य उमेदवार देवून मनसेने संघटना वाढीसाठी बळ दिल्याचे दिसून येत आहे.
नगर शहरातून महायुतीकडून आ. संग्राम जगताप तर महाविकास आघाडीकडून अभिषेक कळमकर यांना संधी दिली आहे. त्यातच आता मनसेने सचिन डफळ यांना संधी दिल्याने नगर शहर मतदार संघात निवडणुकीत चुरस दिसणार आहे.
राहुरी मतदारसंघातून महायुतीकडून शिवाजीराव कर्डिले तर महाविकास आघाडीकडून प्राजक्त तनपुरे यांना संधी दिली आहे. तर मनसेने ज्ञानेश्वर गाडे या उमद्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे.
तर संगमनेर मतदार संघात महाविकास आघाडीकडून बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. त्यातच आता मनसेने योगेश सूर्यवंशी यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत चुरस दिसणार आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने 288 जागांवर उमेदवार देण्याची जाहीर केले होते. उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहीला आहे. मात्र मनसेने सहावी यादी जाहीर करुन आतापर्यंत 112 जागांवर उमेदवार दिले आहेत. आज उद्या इतर उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Comments