आतापर्यंत 20 जणांनी भरले 25 अर्ज तर 65 जणांनी घेतले 121 अर्ज
शेवगाव । वीरभूमी- 28-Oct, 2024, 04:48 PM
शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी आठ जणांनी अर्ज दाखल केले. तर 9 जणांनी 17 उमेदवारी अर्ज खरेदी केले. यामुळे आजपर्यंत 20 जणांनी 25 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 65 जणांनी 121 अर्ज खरेदी केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली आहे.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी संदीप गोरक्षनाथ शेलार, हर्षदा विद्याधर काकडे, यशवंत साहेबराव पाटेकर, विद्याधर जगन्नाथ काकडे, सलमान ईनूस बेग, हरिभाऊ दादा काळे, नवनाथ वामन कवडे, गोकुळ विष्णू दौंड यांनी अर्ज दाखल केले आहेत.
या अगोदर भाजपाच्या उमेदवार मोनिका राजळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे, वंचितचे प्रा. किसन चव्हाण या प्रमुख उमेदवारांसह अपक्ष चंद्रशेखर घुले, हर्षदा काकडे, दिलीप खेडकर आदी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज अखेर 20 जणांनी 25 अर्ज दाखल केले असून 65 जणांनी 121 अर्ज नेले आहेत.
आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्या मंगळवार दि. 29 रोजी अखेरचा दिवस असल्याने उर्वरीत इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करतील असा अंदाज आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रसाद मते हे काम पहात असून त्यांना तहसीलदार प्रशांत सांगडे व तहसीलदार उद्धव नाईक सहाय्य करत आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करणार्या इच्छुकांची संख्या पाहता शेवगाव-पाथर्डी मतदार संघात बहुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. यामुळे कोण उमेदवारी अर्ज ठेवतात व कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात हे सोमवार दि. 4 नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे.
Comments