मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती । 20 ते 25 जागा लढविणार
अहिल्यानगर । वीरभूमी- 03-Nov, 2024, 10:54 PM
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी शेवगाव-पाथर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघासह राज्यातील 15 ते 20 मतदारसंघात निवडणूक लढविण्याची घोषणा केली. रात्री पुन्हा बैठक होवून या मतदारसंघातील उमेदवार ठरविले जाणार आहेत. यामुळे निवडणूक लढविण्यात येणार्या मतदारसंघातून कोण उमेदवार असणार याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी निर्णायक लढा उभारला असून आपण आरक्षणासाठी निवडणुकीच्या रिंगणात काही उमेदवार उतरविणार असल्याची घोषणा सर्व इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या सुचना केल्या होत्या. या सुचनेनंतर अनेक मतदारसंघात पाच ते सहा जणांनी अर्ज दाखल केले होते.
या दाखल अर्जाबाबत एकमत करुन एकाचे नाव जाहीर करावे, अशा सुचना जरांगे पाटील यांनी केल्या होत्या. मात्र आज रविवारी रात्री उशिरापर्यंत नवावर एकमत झाले नाही. त्यानंतर रात्री 10.30 वाजता पत्रकार परिषद घेवून कोणत्या जागा लढवायच्या याची घोषणा केली. इतर जागांवर इच्छुकांनी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले.
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मतदारसंघाची नावे जाहीर केली. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी व कोपरगाव या मतदारसंघासह बीड, परतूर, दौंड, केज, फुलंबी, वसमत, धाराशिव, कळंब, पर्वती, भूम-परांडा, कन्नड, मंठा, पाचोरा या मतदारसंघासह 20 मतदारसंघाचा समावेश असून इतर मतदारसंघाबाबत चर्चा सुरु असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत.
मराठा समाजाला त्रास देणार्यांना संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत मनोज जरांगे म्हणाले, 15 महिण्यांपासून माझा समाज रस्त्यावर आहे. मात्र सरकारकडून चेष्ठा केली जातेय. माझ्या समाजाला दिलेल्या त्रासाचा बदला घेणार, असा इशारा देत मनोज जरांगे पटील भावूक झाले.
Comments