पहिली उचल विनाकपात 3,100 देण्याची मागणी । अन्यथा ऊस वाहतूक बंदचा इशारा
शेवगाव । वीरभूमी- 04-Dec, 2024, 03:35 PM
Swabhimani Shetkari Sanghatana : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुतेक सर्व साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना होत आला आहे. मात्र अद्यापही काही साखर कारखान्यांनी या गाळप हंगामातील उसाचे दर जाहीर केलेले नाहीत. आचारसंहिता असल्याकारणाने शेतकरी संघटनाही अद्याप शांत होत्या. मात्र आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराच्या प्रश्नांबाबत आक्रमक होत पहिली उचल विनाकपात 3100 रुपये देण्याची मागणी केली आहे. कारखान्यांनी या मागणीचा विचार न केल्यास ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना पाठवलेल्या निवेदानामध्ये म्हटले आहे की, यावर्षी खताच्या वाढलेल्या किंमती, मजुरीचे दर, अनियंत्रित हवामान, महागाई या सर्व गोष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. यासर्व गोष्टींचा परिणाम म्हणून ऊस उत्पादनामध्ये घट आलेली आहे. त्याचबरोबर ऊस तोडणी व ऊस वाहतूक दरामध्ये शासन वाढ करते परंतु एफआरपी मधून वाहतूक तोडणी खर्च वजा केला जातो. त्यामुळे ऊस उत्पादकांना कमी मोबदला मिळतो. असे वर्षानुवर्ष चालू असल्यामुळे ऊस उत्पादक अन्य पिकांकडे वळाला आहे. परिणामी उसाचे क्षेत्र घटले आहे.
वरील सर्व घटकांचा विचार केला असता शेतकरी संघटनेने खालील प्रमाणे मागण्या केल्या आहेत. 1) येत्या गळीत हंगामात विना कपात 3,100 रुपये पहिली उचल मिळावी. तसेच हंगाम पूर्ण झाल्याच्या नंतर दुसरी उचल मिळावी. 2) मागील हंगामामध्ये काही कारखान्यांनी शेतकर्यांची ऊसाचे पैसे बाकी आहेत ते व्याजासहित शेतकर्यांच्या खात्यावर जमा करावे. 3) ऊस जाळून केला जाणारा उसाचा पुरवठा तात्काळ बंद करावा. 4) कारखान्यांच्या वजन फाट्याचे शेतकरी संघटनाचे पदाधिकारी व कारखानदार यांचे समक्ष वजन काटा निरीक्षकांकडून तपासणी करावी.
5) सरकारच्या केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे कारखाने व ऊसाच्या बिलातून कोणत्याही प्रकारची कपात करू नये. 6) ऊस वाहतूक करणारे सर्व वाहतूक चालक हे परवानाधारक असावेत, तसेच त्यांचा विमा उतरलेला असावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेवगावचे तहसीलदार तसेच पाथर्डीचे प्रांताधिकारी, प्रादेशिक सहसंचालक आहिल्यानगर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव, तसेच लोकनेते मारुतराव घुले पाटील साखर कारखाना, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, गंगामाई शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड हरीनगर, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना यांना मेल द्वारे पाठवले आहे.
शनिवार दि. 14 डिसेंबर पर्यंत या संदर्भात निर्णय घेऊन शेतकरी संघटना व कारखानदारांचे प्रतिनिधी या संदर्भात बैठक घेऊन निर्णय जाहीर करावा, अन्यथा शेतकरी संघटना व शेतकर्यांच्या वतीने सोमवार दि. 16 डिसेंबर 2024 रोजी ऊसतोड वाहतूक बंद करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी दिला आहे.
Comments