खरेदी खताची नोंद करण्यासाठी मागितली होती लाच । नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी
अहिल्यानगर । वीरभूमी- 06-Dec, 2024, 12:41 PM
तक्रारदाराने खरेदी केेलेल्या जमिनीची सातबारा उतार्यावर नोंद करण्यासाठी 10 हजाराची लाच मागणी केल्याप्रकरणी हाळगावचे तत्कालिन तलाठ्यावर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच मागणार्या तलाठ्याचे नाव मुजीब अब्दुलरब शेख (वय 51 वर्षे, सध्या नेमणुक सजा सावरगावतळ, ता. संगमनेर. रा. नवी पेठ, कर्जत, जि. अहिल्यानगर) असे असून 30 मे 2024 रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अहिल्यानगर विभागाकडे लाच मागणी केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अहिल्यानगर येथील लाचलुचपतचे पोलिस उपअधिक्षक अजित त्रिपुटे यांचेकडे दि. 30 मे 2024 रोजी तक्रारदार यांनी तलाठी यांची तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नं. 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र तक्रारदार यांच्या वडीलांनी खरेदी केले होते. सदर खरेदी खताची नोंद सातबारा उतार्यावर लावण्याच्या मोबदल्यात हाळगाव सजेचे तत्कालिन तलाठी मुजीब अब्दुलरब शेख यांनी तक्रारदार यांचेकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांनी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपिअधक्षक अजित त्रिपुटे यांचेकडे दि. 30 मे 2024 रोजी संबधित तलाठी यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी कारवाई केली असता तत्कालिन तलाठी मुजीब अब्दुलरब शेख यांनी नमुद खरेदी खताची नोंद सातबारा उतार्यावर लावण्यासाठी पंचासमक्ष 10 हजार रुपये लाच स्विकारण्याची तयारी दर्शवल्याचे स्पष्ट झाल्याने संबधित तलाठ्यावर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कामी लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोहेकॉ. संतोष शिंदे, पोना. चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ. हारुन शेख यांच्या पथकाने केली.
0s47uj