गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांची कारवाई । तीन चाकी रिक्षा ताब्यात घेत तिघांवर गुन्हा दाखल
पाथर्डी । वीरभूमी- 19-Jan, 2025, 02:44 AM
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव ते मिरी रोडवर तीन चाकी रिक्षा मधून गोमांसाची वाहतूक करताना गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे व तालुक्यातील गोरक्षकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सुमारे 115 किलो गोमांस व तीन चाकी रिक्षा ताब्यात घेत रिक्षा चालकासह तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तिसगाव येथून एमएच 23, एक्स 2045 या क्रमांकाच्या तीन चाकी रिक्षा मधून गो मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती तालुक्यातील गोरक्षकांना मिळाली. या रिक्षाचा गोरक्षकांनी पाठलाग करत मिरीजवळ या रिक्षाला थांबवले व पोलिसांना पाचारण केले. यानंतर पोलिसांनी कारवाई करत रिक्षा मधील सुमारे 115 किलो गोमांस अंदाजे किंमत 23 हजार रुपये व वाहतूक करणारी तीन चाकी रिक्षा ताब्यात घेतली. पोलिसांनी रिक्षा चालक राजु जाधव व सोबत असलेला अमजेद शेख यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गोमांस तिसगाव येथील इरफान कुरेशी यांचे असल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात गोरक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजू जाधव व अमजद शेख, इरफान कुरेशी (रा. तिसगाव) यांच्या विरोधात गोवंश हत्या बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मोठ्या प्रमाणात कत्तलखाने असुन त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंश हत्या होते व ते गोमांस इतरत्र विक्रीसाठी पाठवले जात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होत होती. परंतु या कारवाई नंतर तिसगाव येथे कत्तलखाना व गोमातेसह गोवंशाची कत्तल होत असल्याचे गोरक्षकाचे म्हणने आहे. या विरोधात पोलिसांनी चौकशी करून कत्तलखान्याविरोधात कारवाई करण्याची मागणी गोरक्षकांनी केली आहे.
6dlxc8