शेवगाव शहर बाह्यवळणसाठी मिळणार निधी
आ. मोनिका राजळे । राष्ट्रीय महामार्ग, भूसंपादन संदर्भात सा.बां. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समवेत बैठक
पाथर्डी । वीरभूमी- 23-Jan, 2025, 08:45 AM
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातून जाणार्या पैठण-पंढरपूर (पालखी मार्ग) व खरवंडी-नवघण-राजुरी या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील शेतकर्यांच्या अडचणी सोडवून कामे पूर्ण होणेसाठी तसेच शेवगाव शहर बाह्यवळण रस्त्यासाठी निधी मिळावा यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व अधिकार्यासमवेत मुंबईत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे लवकरच शेवगाव शहर बाह्यवळणसह राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनातील शेतकर्यांच्या अडचणी दूर होतील अशी माहिती आ. मोनिकाताई राजळे यांनी दिली.
शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 ई-पैठण-पंढरपुर (पालखी मार्ग) व राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 एफ - खरवंडी-नवघण राजुरी या महामार्गाच्या भुसंपादनातील शेतकर्यांच्या अडचणी सोडवून कामे पूर्ण होणेसाठी तसेच शेवगाव शहर बाहयवळण रस्ता तातडीने होणेसाठी बुधवार दि. 22 रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समवेत मुंबई येथील बांधकाम भवन येथे आ. राजळे यांचे उपस्थितीत बैठक झाली.
यावेळी बांधकाम सचिव संजय दसपुते, राष्ट्रीय महामार्ग मुख्यअभियंता संतोष शेलार, अधिक्षक अभियंता भरतकुमार बावीस्कर, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत मते, शाखा अभियंता गजानन सिदलांबे, पी. व्ही. आर. कंपनीचे नायडू तसेच खरवंडी-नवघण राजूरी महामार्गाचे ठेकेदार एस. बी. शेख आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 ई- पैठण-पंढरपूर पालखी मार्ग या महामार्गावरील भालगाव 2, मिडसांगवी, कासाळवाडी या गावांचे भूसंपादनाचे अनुदान अद्याप उपलब्ध झाले नाही. तसेच शेकटे खुर्द, लाडजळगाव, बोधेगाव, हातगाव, मुंगी 1 व मुंगी 2 येथील संपादीत करावयाच्या जमिनीचे शोध अहवाल व समंती पत्र प्राप्त नाही. त्यामुळे निवाडे झाले नसून भूसंपादन प्रक्रिया पुर्ण न झाल्याने रस्त्याचे काम अपुर्ण आहे. ही कामे पूर्ण होण्यासाठी मंत्री महोदयांनी संबंधितांना सूचना दिल्या. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 एफ - खरवंडी-नवघण राजूरी मार्ग यामध्ये खरवंडी, मालेवाडी, मुंगुसवाडे, कासाळवाडी, भालगाव या गावांचा समावेश असून भूसंपादन मोबदला रक्कम 13 कोटी 48 लाख मागणी होती. पैकी 7 कोटी 90 लाख मोबदला रक्कम प्राप्त होणे बाकी आहे. सदर उर्वरीत मोबदला मिळणेसाठी तसेच रस्त्याचे कामे दर्जेदार होणेसाठी सूचना दिल्या.
तसेच येथील निवाड्यामधील त्रुटी दुरुस्ती संदर्भात जिल्हाधिकारी यांचेकडे लवाद अर्ज दि. 19/04/2023 रोजी सादर करण्यात आला आहे. सदर लवाद अर्ज निर्णय होणे बाकी असल्यामुळे पुढील प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे रस्त्यांचे काम अपूर्ण असून शेतकरी व ग्रामस्थ यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निदर्शनास आणून दिले. या संदर्भात दोनही महामार्गाच्या भूसंपादन मोबदला रक्कम व अडचणी बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेबरोबर बैठक घेण्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.
त्याचबरोबर शेवगाव शहर बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण झाले असून भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करुन देवून बाह्यवळण रस्त्याचे काम तातडीने होणेसाठी सकारात्मक चर्चा यावेळी झाली, असल्याची माहिती आ. मोनिकाताई राजळे यांनी दिली. यामुळे शेवगाव शहरातील वाहतूक कोंडीसह राष्ट्रीय महामार्ग भूसंपदादनातील शेतकर्यांच्या अडचणी सुटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
a6p2jw