पाथर्डी । वीरभूमी- 22-Feb, 2025, 04:45 PM
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात 17 वर्षे 8 महिने वयाच्या मुलाचे वय आणि 17 वर्षे 1 महिना 8 दिवस वयाच्या मुलीचा बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. एका सजग नागरिकाने उडान हेल्पलाइन 9011026495 आणि चाइल्ड हेल्पलाइन 1098 वर दिलेल्या माहितीमुळे प्रशासनाने वेळीच पाऊल उचलले आणि हा बालविवाह रोखण्यात यश आले.
बालविवाहाची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी एस. एम. गोल्हार, ग्राम बालसंरक्षण समितीच्या अध्यक्ष व सरपंच मंदाबाई शिवराम बुधवंत, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना तातडीने माहीती दिली.
संयुक्त पथकाने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. मुलीच्या घरी लग्नासाठी मंडप उभारलेला दिसला आणि विवाहाच्या तयारीला वेग आला होता. प्राथमिक चौकशीत असे स्पष्ट झाले की, मोठ्या बहिण-भावाचे लग्न सुरू असताना अल्पवयीन मुला-मुलीचा विवाह लावण्याचा कट होता. परंतु पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करत हा विवाह रोखला. प्रशासनाने आई-वडिलांकडून लेखी जबाब नोंदवून घेतला की, मुलीचे 18 वर्षे आणि मुलाचे 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचे लग्न लावले जाणार नाही. तसेच, बालकल्याण समितीसमोर दोन्ही कुटुंबांना हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. या दोघांचे समुपदेशन करून त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अॅड. जयंत ओहळ, सदस्य अॅड. अनुराधा येवले, तुषार कवडे, रोहिणी कोळपकर तसेच स्नेहालय उडान प्रकल्पाच्या संचालक अॅड. बागेश्री जरंडीकर, हनिफ शेख, चाइल्ड हेल्पलाइन केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी, आणि उडान प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यशस्वी कारवाईसाठी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, पाथर्डी पोलिस स्टेशनचे अधिकारी संतोष मुटकुळे आणि स्थानिक ग्रामपंचायत यंत्रणेच्या सहकार्यामुळे मोठे यश मिळाले. या उल्लेखनीय कार्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांकडून कौतुक करण्यात आले आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अंतर्गत बालविवाह करणे किंवा त्यास सहकार्य करणे हा कायद्याने गुन्हा आहे. दोषींवर एक वर्ष कारावास आणि दोन लाख रुपये दंडाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही लग्नाला जाण्यापूर्वी खात्री करा. मुलगी 18 वर्षांची आहे का? मुलगा 21 वर्षांचा आहे का? अन्यथा, सहभागी होणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. जर कुठेही बालविवाह होत असल्याची शक्यता वाटत असेल, तर तातडीने खालील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
चाइल्ड हेल्पलाइन नं.- 1098, स्नेहालय उडान हेल्पलाइन नं.- 9011026495 तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल. बालविवाह रोखणे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाने जागरूक राहून पुढाकार घेतल्यास आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित होईल!
45lo0k