हजारो कुटुंबाचे स्वतःचे पक्के घराचे स्वप्न साकारतेय
आ. मोनिकाताई राजळे । पाथर्डी पंचायत समिती कार्यालयात घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप
पाथर्डी । वीरभूमी - 23-Feb, 2025, 01:03 AM
स्वतःचे पक्के घर असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो कुटुंबाच्या पक्क्या घराचे हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रत्यक्षात साकारत आहेत. पंचायत समितीने घरकुल प्राप्त लाभार्थ्यांना संपुर्ण सहकार्य करावे. कोणाचीही अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी. लाभार्थ्यांनी ही चांगल्या पद्धतीने घरकुलाचे बांधकाम करून घ्यावेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांचे काम करताना काही गावात कमी जास्त लाभ मिळाल्याच्या तक्रारी येत आहेत. योजनेच्या या टप्प्यात सुमारे पाच हजार घरकुलांना मंजुरी दिली आहे व पहिला हप्ता ही वितरीत केला आहे. घरकुलासह सर्व अनुदानित योजना शेतकरी, गोरगरीब योग्य व खर्या गरजु लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी गाव पातळीवरील पदाधिकारी व पंचायत समितीच्या अधिकारी यांनी प्रामाणिकपणे काळजीपूर्वक प्रयत्न करावेत. असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.पाथर्डी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूरीचे कार्यारंभ आदेश व पहिल्या हप्ताचे वाटपाचा कार्यक्रम आमदार राजळे यांच्या उपस्थितीत पार पडला, यावेळी राजळे बोलत होत्या. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे 300 लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देण्यात आले. राज्यस्तरावर पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र व दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तर तालुक्यातील सुमारे 107 ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याच प्रकारे कार्यक्रम आयोजित करून स्थानिक पातळीवर हे मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व घरकुल संबंधी प्रशिक्षण व अडीअडचणी संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, ज्येष्ठ नेते अशोकराव चोरमले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, सहाय्यक गटविकास अधिकारी संगीता पालवे, विस्तार अधिकारी दत्तात्रय रानमाळ, नांगरे, इंजि.ऋषीकेश पालवे, इंजि. रामेश्वर शिवणकर, इंजि. प्रकाश पालवे, इंजि. विशाल ढगे, विकास डोळे, शुभम वाजपेयी, दत्तात्रय कदम, रविंद्र वायकर, सचिन वायकर, अमृता गवळी आदींसह लाभार्थी उपस्थित होते.
आमदार राजळे यांनी मतदार संघात जास्तीत जास्त घरकुलांना मंजुरीसाठी प्रयत्न केले. या टप्प्यात सुमारे दहा हजार पेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. यावेळी पुढे बोलताना राजळे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांचे देशातील प्रत्येक गरीबांना पक्की घरे, पाणी व वीज मिळाली पाहिजे असे स्वप्न पाहिले व तसे निर्णय घेत विविध योजना आणल्या व त्याचा प्रत्यक्ष व थेट लाभ सर्व सामान्य तळागाळातील घटकाला देत आहेत.
उर्वरित अर्जदारांना ही पुढच्या टप्प्यात लवकरच मंजुरी मिळेल. नवीन व जे वंचित राहीले असतील त्यांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल. काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या दुर करु. या योजनेत केंद्राचा 60 व राज्य सरकारचा 40 टक्के सहभाग आहे. वाढत्या महागाईचा विचार करून अनुदान वाढीसाठी विधीमंडळात मागणी करुन पाठपुरावा करु, असे आश्वासन आ. राजळे यांनी दिले.
तालुक्यात जास्तीतजास्त लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, प्रथम हप्ता वितरण या कामात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, सहायक प्रकल्प अधिकारी, सर्व कर्मचारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ऑपरेटर, ग्रामीण गृह अभियंता यांच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने घरकुलांना मंजुरी मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब चांदेकर यांनी केले तर अमृता गवळी यांनी आभार मानले.
9jkl80