पाथर्डी शहरातील जुन्या बसस्थानका शेजारील स्तंभ मोकळा झाल्याने ठरतोय वाहतुकीस अडथळा
पाथर्डी । वीरभूमी - 23-Feb, 2025, 11:04 AM
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान महामार्गावरील सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेला स्मृतीस्तंभ मोकळा पडला असून आता तो स्तंभ वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. त्याखालील भराव निघून गेल्याने कुठल्याही क्षणी हा स्तंभ पडून गंभीर अपघात होऊ शकतो.
शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात कल्याण-विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर ऐन वळणावर ब्रिटिशांच्या कालात उभारलेला दगडी स्तंभ आहे. 1914 ते 1919 या कालावधीमध्ये महायुद्धात ज्यांनी कामगिरी बजावली त्या सैनिकांच्या गौरवार्थ असा स्तंभ ब्रिटिश कालापासून उभारण्यात आलेला आहे. या युद्धामध्ये ज्या ज्या मित्र राष्ट्रांनी सहभाग घेतला, त्यात शहीद झालेल्या एकूण सैनिकांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेला स्तंभ ब्रिटिश राजवट असल्यामुळे येथे उभारला जाऊन गौरवाची भारतीय परंपरा जोपासत नव्याने सैन्य दलात दाखल होण्यासाठीचे आकर्षण या स्तंभामुळे व्हावे, असाही हेतू त्यावेळी ठेवण्यात आला असावा.
त्या स्तंभावर तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील सहभागी सैनिकांचा उल्लेख नाही ज्या काळात स्तंभ उभारला गेला त्यावेळी पाथर्डीला शेवगाव तालुका होता. पाथर्डी शहर म्हणजे पेठा या दर्जाचे होते. भारतीय स्वातंत्र्य युद्धाचा व या स्तंभाचा कसलाही संबंध नसून ब्रिटिशांच्या कालावधीत ज्यावेळी विविध बांधकामे झाली तशाच पद्धतीच्या दगडामध्ये सुमारे आठ फूट उंच असा दगडी स्तंभ आहे. पूर्वी या स्तंभाभोवती दगडी चौथरा व दगडाच्या छोट्या खुंटाचे कंपाउंड होते. काळाच्या ओघात चौथरा दबला गेला. उंच असल्यामुळे केवळ स्तंभ राहिला. अतिक्रमण हटविल्यानंतर त्यावरील कोरलेला मजकूर सर्व नागरिकांना सहजपणे वाचता येऊ लागला.
या स्तंभाच्या सुशोभीकरणाबाबत मागील वर्षी आमदार मोनिका राजळे यांनी स्थानिक प्रशासनाला आदेश दिले होते. तथापि महामार्ग विभागाला हा स्तंभ अडथळा ठरुन अवजड वाहतुकीला त्रास होऊ शकतो यामुळे हा स्तंभ शहरात इतरत्र हलवून ती जागा महामार्ग विभागाने ताब्यात घ्यावी. असा पर्याय सर्वांमध्ये मान्य करण्यात आला. मात्र त्याचीही अंमलबजावणी अद्याप पर्यंत झालेली नाही.
विशेष गमतीचा भाग म्हणजे अतिक्रमण हटवून टपरी नष्ट झाल्याने एका विक्रेत्याने या स्तंभाचा वापर छत्रीच्या दांडी सारखा करून त्याला वरून गोलाकार छत्री बांधली आहे. त्यामुळे आधुनिक टपरी सर्व बाजूंनी खेळती हवा असलेली झाल्याने नागरिकांना नवी टपरी व नव्या रूपातील स्तंभ बघायला मिळत आहे.
चुकून या स्तंभाला जोरात धक्का लागल्यास किंवा त्यावर शाळकरी मुले उभी राहिल्यास हा स्तंभ कुठल्याही क्षणी खाली पडू शकतो. कारण त्याला आधार राहिलेला नाही. त्यामुळे महामार्ग विभाग, शहर वाहतूक विभाग व पालिका अतिक्रमण विभागाने हा स्तंभ त्वरित हलवून सुरक्षित स्थळी ठेवावा व बाजार तळावरील पालिका कार्यालयासमोरील ध्वज वंदनाच्या जागे शेजारी याची स्थापना करावी, अशी नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
eemeyv