गर्दी विचारात घेत निर्णय । पोलिस बंदोबस्त तैनात
पाथर्डी । वीरभूमी- 28-Mar, 2025, 06:30 PM
सावरगाव येथील श्रीक्षेत्र मायंबा येथे शनिवार दि. 29 मार्च रोजी चैतन्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीला पवित्र सुगंधी उटणे लेपन लावण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातून भाविक मायंबा गडावर दाखल होत असतात. यावर्षी भाविकांची प्रचंड गर्दी विचारात घेत श्रीक्षेत्र मायंबा येथे जाण्यासाठी असलेल्या मढी ते मायंबा घाट व वृद्धेश्वर घाट मार्गे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे.
या दोन्ही मार्गावर एकेरी वाहतूक केल्यामुळे श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर श्रीक्षेत्र मढी मार्गे मायंबा घाटातून जाता येणार नाही. तर जाण्यासाठी मढी ते घाटशिरस, देवराई-घाटशिरस, सावरगाव, मायंबा असे जावे लागणार आहे. तर श्रीक्षेत्र मायंबा ते मढी घाट मार्गे श्रीक्षेत्र मढी-तिसगाव असा मार्ग माघारी फिरण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.
यात्रेनिमित्त राज्यभरातून भाविक श्रीक्षेत्र मायंबा व श्रीक्षेत्र मढी येथे येत असतात. भाविकांची गर्दी विचारात घेवून पोलिस प्रशासनाकडून सर्व बाजूंनी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यामुळे मायंबा गडावर जाण्यासाठी वृद्धेश्वर मार्गे जावे लागणार आहे तर गडावरुन येण्यासाठी श्रीक्षेत्र मढी मार्गे यावे लागणार आहे.
Comments